बारावीची शाखानिहाय टक्केवारीही वाढली, मुंबई विभागाच्या निकालात ५.५ टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 03:17 AM2020-07-17T03:17:59+5:302020-07-17T03:18:15+5:30
मुंबई विभागातून शाखानिहाय विज्ञान शाखेत ९५.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखा ८०.४१ टक्के, तर वाणिज्य शाखेतून ८८.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाच्या निकालात यंदा ५.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबई विभागीय मंडळाचा निकाल ८९.३५ टक्के लागला असून मागील वर्षी तो ८३.८५ टक्के इतका होता.
मुंबईतून एकूण ३ लाख १३ हजार २९१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २ लाख ७९ हजार ९३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४३ हजार ३७० विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन म्हणजेच ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. यंदाच्या एकूण निकालाच्या टक्केवारीत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.९७ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८७ इतकी आहे. राज्याच्या निकालात मागील वर्षी सातव्या स्थानावर असणाऱ्या मुंबई विभागाने यंदाही आपले सातव्या क्रमांकाचे स्थान कायम राखले आहे.
मुंबई विभागातून शाखानिहाय विज्ञान शाखेत ९५.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखा ८०.४१ टक्के, तर वाणिज्य शाखेतून ८८.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्होकेशनल घेऊन परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची टक्केवारी ९१.७६ टक्के इतकी आहे. यंदा एकूण निकालात झालेल्या वाढीमुळे शाखानिहाय निकालातही वाढ झाली आहे.
मुंबई विभागात ठाणे, पालघर, रायगड, ग्रेटर मुंबई, मुंबई उपनगर १, मुंबई उपनगर २ या जिल्ह्यांचा समावेश होत असून रायगड जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वात जास्त म्हणजे ९१.२८ टक्के आहे. त्याखालोखाल मुंबई उपनगर २ ची ९०.२१ टक्के, ठाणे ८९.८६ टक्के, पालघर ८९.८५ टक्के, मुंबई उपनगर १ ची ८८.५४ टक्के, तर ग्रेटर मुंबई ८६.७२ टक्के अशी उत्तीर्णांची टक्केवारी आहे.
विज्ञान शाखेच्या निकालात यंदा
८ टक्क्यांची वाढ; तरीही मुंबई तळाशी
मुंबई विभागाचा निकाल इतर विभागीय मंडळांपेक्षा कमीच लागला आहे. विज्ञान शाखेचा मुंबईचा निकाल ९५.१६% असून तो मागील वर्षापेक्षा ८ टक्क्यांनी जास्त आहे. मात्र यंदा इतर विभागीय मंडळांशी तुलना केल्यास विज्ञान शाखेच्या निकालात मुंबई तळाशी असल्याचे दिसून येत आहे.
कला शाखेचा मुंबई विभागाचा यंदाचा निकाल ८०.४१ टक्के असून इतर विभागांशी तुलना केल्यास कला शाखेच्या निकालात मुंबई आठव्या स्थानावर आहे. मागील वर्षापेक्षा कला शाखेच्या निकालात यंदा ६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
वाणिज्य शाखेत मागील वर्षापेक्षा यंदा ३.६ टक्क्यांची वाढ दिसून आली. मागील वर्षी वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी ८५.२८ टक्के होती तर यंदा ती ८८.८८ टक्के इतकी आहे. मात्र इतर विभागांशी तुलना केल्यास मुंबई वाणिज्य शाखेच्या निकालातही सर्वात तळाशी असल्याचे दिसत आहे. व्होकेशनलचा यंदाचा निकाल ९१.७६ टक्के लागला असून राज्यात व्होकेशनलच्या निकालात मुंबई दुसरी आहे.
ध्रुव रांबिया
पेस ज्युनिअर सायन्स कॉलेज
विज्ञान शाखा : ९७.२%
माझा मेन फोकस जेईई अॅडव्हान्स आहे. बारावीत चांगले गुण मिळाले. जेईईमध्ये यापेक्षा अधिक चांगले गुण मिळवून आयआयटी किंवा एखाद्या चांगल्या संशोधन संस्थेमध्ये प्रवेश मिळविणे हे उद्दिष्ट आहे. माझ्या यशात आईवडिलांचा मोठा वाटा असून त्यांना खूप आनंद झाला आहे.
चैताली कारेकर
पाटकर महाविद्यालय
विज्ञान - ९६.४६%
माझा यशामुळे घरी सर्व खूप खुश आहेत. ते सर्व माझ्या पाठीशी होते म्हणून मी एवढे मोठे यश संपादन करू शकले. आता सीईटी, जेईई साठीची तयारी करणार आहे. सोबतच मला इंजिनीअरिंगमध्ये शिक्षण घ्यायचे आहे.
प्रीत जैन
जयहिंद महाविद्यालय
कला शाखा : ९६%
कॉलेजमधील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळे अभ्यासाला अधिक मदत झाली. विशेष म्हणजे रात्री जागून केलेला अभ्यास जास्त उपयोगी आला. स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू असून यूपीएससीच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. सध्या विधि प्रवेशाची तयारी सुरू आहे.
श्रावणी जोशी
वझे केळकर महाविद्यालय
वाणिज्य शाखा : ९५. ३८%
ठरविल्याप्रमाणे अकाउंट विषयात १०० गुण मिळाल्याने अधिक आनंद झाला. यामुळे माझ्या सीए होण्याच्या स्वप्नाजवळ मी सहज जाऊ शकणार आहे. नियमित अभ्यास, सर्व परीक्षा आणि महाविद्यालयातील तसेच क्लासमधील शिक्षकांचे मार्गदर्शन याचा खूप उपयोग झाला.
विदुला घोडेकर
सेंट जोसेफ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कळंबोली
विज्ञान शाखा : ९५.८४%
निकाल समजला तेव्हा माझ्यासह आई, बाबा आणि सर्वांनाच खूप आनंद झाला. रोजचा १५ ते १६ तास नियमित अभ्यास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हेच माझ्या यशाचे रहस्य आहे. भविष्यात आर्किटेक्चर क्षेत्रात प्रवेशाची इच्छा आहे.