मुंबई : मुंबई महापालिकेकडून विविध विकास प्रकल्प राबवताना प्रकल्प बाधितांकडून अनेकदा आडकाठी आणली जाते, त्याला विरोध केला जातो. परंतु पुनर्विकास करताना प्रकल्पग्रस्तांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या घराजवळच जागा देण्याचा पालिकेकडून प्रयत्न सुरू आहे, तशी माहिती देणारी चित्रफीतच प्रशासनाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. मात्र, आगामी पालिका निवडणूक पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाचे ब्रँडिंग केले असून या चित्रफितीत उपमुख्यमंत्रीही झळकले आहेत.
शहराच्या प्रगतीसाठी विकासकामे गरजेची असून रस्ता रुंदीकरण असो वा एखादा प्रकल्प असो पालिकेकडून राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पात अनेक कुटुंबांना स्वतःचे राहते घर सोडून विस्थापित व्हावे लागते. असे घडू नये यासाठी घराजवळच पुनर्वसन करण्याची मागणी कुटुंबीयांकडून केली जाते. मात्र अनेकदा ते शक्य नसते त्यामुळे ही कुटुंब दिवाणी, सत्र अथवा उच्च न्यायालयात जाऊन या प्रकल्पांना स्थगिती मिळवतात.
पालिकेकडून मुंबईचा कायापालट केला जात असून प्रकल्पांना विरोध होऊ नये म्हणून घराजवळ सोय करता यावी अशी योजना पालिका राबवणार आहे. पुनर्विकास मुंबईच्या विकासासाठी या मथळ्याखाली माहिती देणारी २ मिनिटे ३७ सेकंदांची चित्रफीत पालिकेकडून तयार करण्यात आली असून प्रशासनाने ती सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.
१३ हजार ९०० सदनिका बांधणार
या प्रकल्पग्रस्तांच्या शक्य तितक्या घराजवळच पुनर्वसन करण्याची योजना पालिका प्रशासनाची आहे. या प्रकल्पाअंतर्गत पालिका १३ हजार ९०० सदनिका बांधणार आहे. या घरांमुळे मुंबईकरांची सोय होणार आहे.
यू ट्यूब फक्त २१४ व्ह्यूज
ही चित्रफीत यू ट्यूब, ट्विटर, फेसबुकवर प्रसारित करण्यात आली असून दोन दिवसात यू ट्यूबवर फक्त २१४ जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. माय बीएमसी, माय मुंबई या महापालिकेच्या यू ट्यूब चॅनलवर ही चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली आहे.