ज्वारी, बाजरीच्या भाकरीचे ब्रँडिंग करणे गरजेचे, मंत्री चंद्रकांत पाटील : रुईया महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 10:13 AM2023-01-31T10:13:05+5:302023-01-31T10:14:04+5:30
Chandrakant Patil : शहरात कधीतरी खाल्ल्या जाणाऱ्या, मात्र ग्रामीण भागात दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाचा भाग असणाऱ्या या भरडधान्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे आहे, तरच ग्रामीण भागातील लोकांच्याही विकासाला हातभार लागू शकेल
मुंबई : रोजच्या खाण्यातील ज्वारी, बाजरी आणि इतर भरड धान्य हे आरोग्य आणि एकूण निरोगी आयुष्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे शहरात कधीतरी खाल्ल्या जाणाऱ्या, मात्र ग्रामीण भागात दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाचा भाग असणाऱ्या या भरडधान्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे आहे, तरच ग्रामीण भागातील लोकांच्याही विकासाला हातभार लागू शकेल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. मुंबईतील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयात आयोजित भरडधान्य २०२३ - पुनरुत्थान व निरंतरतेचा आंतरशास्त्रीय दृष्टिकोन या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यामुळे भरडधान्याच्या योगदानाचे महत्त्व आणि पोषक आरोग्यदायी आहार म्हणून त्याची उपयुक्तता याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून रुईया महाविद्यालयात दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५ देशांतील २७५ हून अधिक लोकांनी, तर १० राज्यांतील प्रतिनिधींनी भाग घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागातर्फे महाविद्यालयाच्या या परिषदेला ५ लाखांचे वित्तीय साहाय्य जाहीर झाले असून, अशा प्रकारचे अनुदान मिळणारे रुईया महाविद्यालय हे देशातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. या परिषदेमुळे आरोग्यदायी आहारामध्ये भरडधान्याचे महत्त्व आणि उपयुक्तता याबाबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती आणि या क्षेत्रात संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळेल, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
स्वायत्त महाविद्यालयांकडून नावीन्यपूर्ण कोर्स डिझाइन करणे आवश्यक
अभ्यासक्रमात नावीन्य आणि कौशल्यपूर्ण कोर्स डिझाईन करणे आवश्यक असून, अनेक स्वायत्त महाविद्यालयांकडून ते केले जात आहेत.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून १४४ महाविद्यालयांना स्वायत्तता दिली असून, ते चांगले काम करत असल्याची माहिती पाटील यांनी दिली.