ब्रीच कॅण्डी ते शिवाजी पार्क, व्हाया प्रभुकुंज; गानसम्राज्ञीचे अखेरचे दर्शन व्हावे यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 06:45 AM2022-02-07T06:45:22+5:302022-02-07T06:48:04+5:30

रुग्णालयाबाहेर गर्दी होत होती आणि आजूबाजूचा सगळा परिसर शोकमय झाला. आपल्या कुटुंबातील एक सदस्य गमावल्याची भावना प्रत्येकाच्याच मनात होती.

Breach Candy to Shivaji Park, Via Prabhukunj; Huge crowd of fans to pay their last respects to the Latadidi | ब्रीच कॅण्डी ते शिवाजी पार्क, व्हाया प्रभुकुंज; गानसम्राज्ञीचे अखेरचे दर्शन व्हावे यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी

(छाया : दत्ता खेडेकर)

googlenewsNext

मुंबई: ज्याची भीती वाटत होती ती बातमी अखेर आलीच. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त घेऊनच रविवारची सकाळ उगवली आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला.  गेल्या महिनाभरापासून येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लतादीदींची मृत्यूशी झुंज संपल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी देताच हे वृत्त रविवारी वा-यासारखे पसरले आणि रुग्णालय परिसरात चाहत्यांची गर्दी वाढू लागली. 

रुग्णालयाबाहेर गर्दी होत होती आणि आजूबाजूचा सगळा परिसर शोकमय झाला. आपल्या कुटुंबातील एक सदस्य गमावल्याची भावना प्रत्येकाच्याच मनात होती. रुग्णालयापासून मंगेशकर यांचे निवासस्थान असलेले प्रभुकुंज परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. रुग्णालयातील सोपस्कार पार पडल्यावर दीदींचे पार्थिव रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले. यावेळी भुलाभाई देसाई रस्ता ’लता दीदी अमर रहे’च्या घोषणांनी निनादून गेला. दुपारी पावणेदोनच्या सुमारास त्यांचे पार्थिव रुग्णालयातून प्रभूकुंज या निवासस्थानी आणण्यात आले. मंगेशकर कुटुंबीय व मान्यवरांनी लतादीदींचे अत्यंदर्शन घेतले. 

अंत्यदर्शनासाठी अमिताभ बच्चन यांच्यासह संगीत आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांची रीघ लागली होती. अवघा ‘सूरसागर’ लतादीदींच्या अंत्यदर्शनाला लोटला होता.

दुपारी चारच्या सुमारास दीदींचे पार्थिव घरातून खाली आणले गेले. तेथे लष्कर, हवाई दल, नौदल आणि महाराष्ट्र पोलीस दलातर्फे लतादीदींना संयुक्त मानवंदना देण्यात आली. फुलांनी सजवलेल्या लष्करी वाहनावर लतादीदींची सर्व परिचित छबी लावण्यात आली होती. त्या वाहनावर दीदींचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यांच्या पार्थिवासोबत, दीदींच्या भगिनी आशा भोसले, उषा मंगेशकर, आदीनाथ आणि बैजनाथ हे भाचे आदी कुटुंबीय उपस्थित होते. प्रभुकुंज येथून अंत्ययात्रा शिवाजी पार्कच्या दिशेने ४.१० मिनिटांनी निघाली. हाजी अली, वरळी नाका, सिद्धिविनायक मंदिर मार्गे ती शिवाजी पार्क येथे पोहोचली तेव्हा ५.४० मिनिटे झाली होती. पेडर अंत्ययात्रेत लतादीदींचे असंख्य चाहते सहभागी झाले. पेडर रोड ते शिवाजी पार्क हे जवळपास साडेसात किलोमीटर अंतर पायी चालत त्यांनी दीदींना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली.

अंत्ययात्रेच्या मार्गावर दुतर्फा चाहत्यांनी लाडक्या दीदींचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. मोबाइलच्या कॅमेऱ्यात लतादीदींच्या अंत्ययात्रेची दृश्ये साठवून ठेवण्याची अनेकांची धडपड सुरू होती. रस्त्याच्या दुतर्फा चाहते आणि मधोमध लतादीदींचे पार्थिव ठेवलेले वाहन, असे चित्र पेडर रोड ते शिवाजी पार्कपर्यंत होते. गानसम्राज्ञीला अखेरचा निरोप देताना अनेकांचा हुंदका दाटून आला. ‘लता दीदी अमर रहे, जब तक सूरज चाँद रहेगा, दीदी तेरा नाम रहेगा,’ अशा घोषणा देत चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली. काहींनी ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणे म्हणत लतादीदींच्या आठवणींना उजाळा दिला.
 

Web Title: Breach Candy to Shivaji Park, Via Prabhukunj; Huge crowd of fans to pay their last respects to the Latadidi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.