मुंबई : वाहनांवर प्रचाराच्या आशयाचे मजकूर छापून मुलुंडमध्ये तीन वाहनचालकांनी आचारसंहितेचा भंग केला होता. मुलुंड पोलिसांनी अशा वाहनांचा शोध घेत त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
निवडणुकीत प्रचार करण्यासाठी राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाकडून परवानगी घ्यावी लागते. मुलुंड परिसरात भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता, त्यांच्या खासगी वाहनांवर मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांची जाहिरात करून आचारसंहितेचा भंग केला. त्यात त्यांनी कोटेचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र असलेले मजकूर लावले होते.
याबाबत एका नागरिकाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत यावर कारवाई करत मुलुंड पोलिसांनी संबंधित तीन वाहने ताब्यात घेत वाहनचालकांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड वसूल केला आहे.