मायानगरीत ‘तिच्या’ स्वप्नांचा भंग, गेल्या दोन महिन्यांत सात जणींची वेश्याव्यवसायातून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 10:34 AM2024-03-18T10:34:32+5:302024-03-18T10:35:43+5:30
गेल्या दोन महिन्यांत मुंबई पोलिसांनी सात जणींची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे.
मुंबई : नोकरीच्या बहाण्याने विविध भागांतून तरुणींना मुंबई, नवी मुंबईत आणायचे. स्वप्नाचे गाठोडे घेऊन मायानगरीत उतरताच तिच्याकडील ऐवज काढून घेत आरोपी तिला वेश्याव्यवसायात ढकलत असल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईतून समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यांत मुंबई पोलिसांनी सात जणींची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे.
२३ वर्षीय तक्रारदार तरुणी मूळची कोलकाता येथील रहिवासी आहे. घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तिलाही मुंबईची ओढ लागली. आरोपी राजू याने तिला घरकामाची नोकरी देण्याचे आश्वासन देऊन नवी मुंबईतील नेरूळ येथे आणले. पहिल्याच दिवशी आधी जवळील दागिने, पैसे गमावले आणि चांगल्या पगाराच्या नोकरीचे स्वप्न तिच्याप्रमाणे एका खोलीत कैद झाले. मात्र, तिची बाहेर पडण्याची धडपड सुरू होती. अखेर सुटका करत या तरुणीने समाजसेवी संस्थेच्या अधिकाऱ्याच्या मदतीने गुन्हे शाखेकडे तक्रार केली.
८६ महिलांची सुटका -
मुंबई पोलिसांनी वेळोवेळी अशा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गेल्यावर्षी पोलिसांनी ८६ महिलांची सुटका करत ६४ जणांना बेड्या ठोकल्या, तर २०२२ मध्ये १४० महिलांची सुटका करत १०२ जणांना अटक करण्यात आली होती. यावर्षी जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान ७ जणींची सुटका करत ३ जणांना अटक केली. तत्पूर्वी मुंबईत आणलेल्या पश्चिम बंगालच्या तरुणीचा लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीने सौदा केल्याची घटना समोर आली होती. यामध्येही पोलिसांनी कारवाई करत तिची सुटका केली.
गुजरातमध्ये लग्नासाठी विक्री...
मुंबईतील मुलींचा नोकरीच्या बहाण्याने गुजरातमध्ये सौदा केल्याचे उघड झाले हाेते. अहमदाबादमध्ये असलेल्या बकराना गावात मुलींचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी असल्याने ते देशाच्या कोनाकोपऱ्यातून पळवलेल्या मुलींना खरेदी करून बळजबरीने विवाह करत असल्याचे पायधुनी पोलिसांच्या कारवाईत समोर आले होते.