Join us

राज्यातील २२ परिवहन कार्यालयांत होणार ‘ब्रेक टेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 2:05 AM

वाहनांची तपासणी; प्रस्तावाला वित्त विभागाची मंजुरी, ६३ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : राज्यात २२ परिवहन कार्यालयांत अद्ययावत व संगणकीकृत वाहन तपासणी ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ उभारण्यात येणार असून, त्याला ६३.३६ कोटींचा खर्च येणार आहे. परिवहन विभागाच्या या प्रस्तावाला वित्त विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील २२ परिवहन कार्यालयांमध्ये दुचाकींचे २७, चारचाकी वाहनांचे २३ व अवजड वाहनांचे १२ संगणकीकृत ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ उभारण्यात येणार आहेत. रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, बेस्ट बस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या, व्यावसायिक आणि अवजड वाहनांची आरटीओमध्ये दर दोन वर्षांनी फिटनेस (तंदुरुस्ती) तपासणी केली जाते. त्यामध्ये ब्रेक, प्रदूषण, वाहनांचे सस्पेन्शन, चाके, वेग, हेडलाइट, टेललाइट आदी घटकांचा समावेश असतो. या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप केला जात असल्याने, गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने वाहन तपासणीसाठी २५० मीटरचा ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ आवश्यक असल्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, हा निर्णय घेण्यात आला आहे.येथे ‘ब्रेक टेस्ट ट्रॅक’ताडदेव(मुंबई), अंधेरी, वडाळा, आळंदी(पुणे), सासवड (पुणे), हडपसर (पुणे), कोल्हापूर, कºहाड, मर्फी (ठाणे), नांदिवली (ठाणे), पनवेल, पेण, नाशिक, अमरावती, बडनेरा, धुळे, औरंगाबाद, कोर्डी, लातूर, नांदेड, नागपूर (शहर), नागपूर (ग्रामीण).