यदु जोशीमुंबई : ‘एकदाची युती तोडा, हीच संधी आहे, स्वबळावर लढा’ असा दबाव जिल्ह्या- जिल्ह्यांमधून भाजपच्या प्रदेश नेतृत्वावर येत आहे. मात्र, आपल्याला युती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जावे लागणार, असे नेतृत्वाकडून सांगितले जात असल्याने कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे.
युती तोडण्याबाबत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातून अधिक दबाव येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात युतीवरून अस्वस्थता दिसत आहे. शहरातील सर्व सहा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. तिथे शिवसेनेला एकही जागा द्यायला स्थानिक नेते तयार नसल्याचे सांगण्यात येते.
तीच परिस्थिती नागपूर ग्रामीणमध्ये आहे. सावनेरवगळता सगळीकडे भाजपचे आमदार आहेत. शिवसेनेला एकही जागा दिली तरी भाजपच्या विद्यमान आमदारास घरी बसावे लागेल. युतीत १४४ जागा घेण्याऐवजी रामदास आठवले यांचा रिपाइं, महादेव जानकरांचा रासप, सदाभाऊ खोत यांना सोबत घेऊन २८८ जागा लढवाव्यात, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.
हेच चित्र नाशिक, पुणे या शहरांमध्ये आहे. सर्व जागा भाजपकडे असताना शिवसेनेला जागा देऊन आमदारांना घरी बसवणार का, असा कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदारांचा सवाल आहे. आम्ही पक्षाच्या शिस्तीनुसार माध्यमांसमोर बोलू शकत नाही; पण नेत्यांच्या गाठीभेटी होतात तेव्हा त्यांना युती करू नका, असेच सांगत आहोत, असे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुकीतील यशामुळे उत्साहात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना स्वबळावरच निवडणूक लढावी असे वाटते. सोलापूर, सांगली, लातूर, अहमदनगरमध्येही स्थानिक नेत्यांचा स्वबळाचा सूर आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले की, युती तोडण्याचा दबाव नाही पण भावना आहेत. स्वबळावर लढलो तरी सत्ता येईल, असे काही जण सांगतात, पण हा सूर सार्वत्रिक नाही. भाजपने शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील भाजपचे पदाधिकारी म्हणाले की, स्वबळावर लढावे, असा आग्रह मुंबईतही आहे. दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र लोकांनाच हवे असल्याचे कार्यकर्ते म्हणवतात. सेनेला सोबत घेतले तर पुन्हा त्रास सहन करावा लागेल, अशी भावना आहे. सेनेचे आमदार, मंत्री मागताहेत महाजनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश यात्रा’ १ आॅगस्टपासून सुरू होत आहे. ती आपल्या मतदारसंघातून जावी यासाठी शिवसेनेचे काही आमदार आणि मंत्र्यांनीही मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
युतीचा अंदाज येत नसल्याने आघाडीचे आमदार थांबले काँग्रेस, राष्ट्रवादीतून बाहेर पडू इच्छिणाºया ७५ टक्के आमदारांचा कल हा भाजपमध्ये जाण्याचा आहे; पण त्यांच्यापैकी काहींचे मतदारसंघ पूर्वीचे शिवसेनेच्या कोट्यातील आहेत. भाजपने ती जागा शिवसेनेकडून स्वत:च्या कोट्यात घ्यावी; कारण आपल्याला भाजपकडूनच लढायचे आहे, असे या आमदारांचे म्हणणे आहे. तसे होत नाही तोवर पक्षांतराचा निर्णय त्यांनी रोखून धरला आहे.
शिवसेनेशी युती नक्की होणार - चंद्रकांत पाटीलकोल्हापूर : सध्याचे सर्व्हे पाहता राज्यात भाजपला स्वबळावर लढण्यासाठी अनुकूल वातावरण आहे; परंतु दोन्ही काँग्रेस एकत्र लढताना आम्हाला रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे शिवसेनेशी युती नक्की होणार आहे. याबाबत कुणीही मनात संशय बाळगू नये, असा निर्वाळा शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे दिला.