Join us  

वाढदिवसाच्या खर्चाला फाटा

By admin | Published: February 27, 2016 2:55 AM

वाढदिवसाच्या हारतुरे आणि होर्डिंग आदी खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा राष्ट्रवादीचे सरचिटणीस उमेश पाटील यांनी केली आहे.

मुंबई : वाढदिवसाच्या हारतुरे आणि होर्डिंग आदी खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा राष्ट्रवादीचे सरचिटणीस उमेश पाटील यांनी केली आहे. त्यासाठी ७ मार्चपासून सद्भावना यात्रा आयोजित करण्यात आली असून आपल्या ३६ व्या वाढदिवसानिमित्त ३६ कुटुंबांना प्रत्येकी १० हजाराचा मदत निधी वितरीत करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. राज्यात सलग ३-४ वर्षे दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, गारपीट अशा संकटांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. २०१५ साली जवळपास २८२८ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशा परिस्थितीत सार्वजनिक जीवनातील कार्यकर्त्यांनी लग्न, वाढदिवस यासारख्या समारंभांवर होणारा खर्च टाळून, दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांंना मदत करायला हवी, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्या अनुषंगाने आपल्या ३६ व्या वाढदिवसानिमित्त ३६ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १० हजाराची मदत करण्याचा निर्णय उमेश पाटील यांनी घेतला आहे. पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांंनाही किमान एक वर्ष तरी वाढदिवस साजरे न करता शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. त्याला अनेकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला आहे. कार्यकर्ते व समाजातील अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची थेट मदत सद्भावना यात्रेच्या माध्यमातून करण्याचा संकल्प उमेश पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते ७ मार्च रोजी सद्भावना यात्रेला सुरुवात होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)