बफर तोडून लोकल फलाटाला धडकली
By admin | Published: June 29, 2015 03:36 AM2015-06-29T03:36:31+5:302015-06-29T03:41:44+5:30
भार्इंदरपासून मरिन लाइन्सपर्यंत सुरळीत आलेली लोकल चर्चगेट स्थानकात येताच थेट बफर तोडून तब्बल १0 ते १५ फुटांपर्यंत फलाटावर चढली.
मुंबई : भार्इंदरपासून मरिन लाइन्सपर्यंत सुरळीत आलेली लोकल चर्चगेट स्थानकात येताच थेट बफर तोडून तब्बल १0 ते १५ फुटांपर्यंत फलाटावर चढली. रविवारी सकाळी घडलेल्या या अपघातात एका महिलेसह पाच प्रवासी जखमी झाले. विशेष म्हणजे सुटीचा दिवस असल्याने सुदैवाने फलाटावर आणि ट्रेनमध्ये फारशी गर्दी नव्हती अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
या अपघाताला कारणीभूत असलेल्या मोटरमनसह गार्ड आणि लोको इन्स्पेक्टरला पश्चिम रेल्वेने निलंबित केले आहे. ब्रेकमधील बिघाड अथवा मोटरमनच्या चुकीमुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
भार्इंदरहून चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या या १५ डबा जलद लोकलचे मोटरमन एल. एस. तिवारी होते. सकाळी ११.२0च्या सुमारास या लोकलने चर्चगेट स्थानकातील फलाट क्रमांक ३ वर प्रवेश केला. मात्र स्थानकात प्रवेश केल्यानंतर ती अचानक बफरवर (आपत्कालीन परिस्थितीत लोकल थांबवण्यासाठी असलेली व्यवस्था) आदळली आणि बफर तोडून या लोकलचा पहिला डबा (मोटरमनसह महिला डबा) तब्बल 15 फूट उंच उडून खाली आदळला. यात मोटरमनच्या केबिनचा अक्षरश: चक्काचूर झाला. आत अडकलेल्या मोटरमनला रेल्वे पोलीस तसेच टीसी आणि अन्य मोटरमनकडून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. अथक प्रयत्नानंतर डब्यावर चढून जखमी मोटरमनला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले.
मोटरमनसह तिघे निलंबित
या घटनेत मोटरमनसह गार्ड आणि लोको इन्स्पेक्टरला निलंबित केल्याचे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी सांगितले. एक चौकशी समिती नेमली असून पाच दिवसांत त्याचा अहवाल येईल, असे सांगण्यात आले.