चाकोरी तोडा, नवा पायंडा पाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2015 03:27 AM2015-06-28T03:27:16+5:302015-06-28T03:27:16+5:30

समाजात असे अनेक लोक असतात जे आपल्या चाकोरीत संतुष्ट असतात. त्यांना धोका पत्करायचा नसतो. आयुष्याकडून त्यांच्या फारशा अपेक्षाही नसतात.

Break the chakra, break the new regime | चाकोरी तोडा, नवा पायंडा पाडा

चाकोरी तोडा, नवा पायंडा पाडा

googlenewsNext

टर्निंग पॉइंट
- प्रशांत असलेकर

समाजात असे अनेक लोक असतात जे आपल्या चाकोरीत संतुष्ट असतात. त्यांना धोका पत्करायचा नसतो. आयुष्याकडून त्यांच्या फारशा अपेक्षाही नसतात. त्यांच्याबाबतीत टर्निंग पॉइंट कधी येतच नाही. ज्यांना आपली क्षमता माहीत असते, जे आपल्या परिस्थितीबाबत संतुष्ट नसतात, ती बदलण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबाबतीत टर्निंग पॉइंट येतो. त्या वळणावर त्यांचे आयुष्य नवे वळण घेते आणि ते चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्यांच्या फार पुढे निघून जातात. के.डी. इन्स्ट्रुमेंट्सच्या देवराम गागरे यांच्याबाबतीत नेमके हेच घडले आहे. एकेकाळी पब्लिक लिमिटेड कंपनीत आणि सिनिअर एक्झिक्युटिव्ह इंजिनीअरची सुरक्षित नोकरी करणारे देवराम गागरे त्यात संतुष्ट नव्हते. त्यांना आपली क्षमता माहीत होती. जे मिळवलं त्यापेक्षा जास्त मिळवायची आपली पात्रता आहे हे त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी ती नोकरी सोडली. स्वत:चा इन्स्ट्रुमेंटेशनचा व्यवसाय सुरू केला. आज ते देशात आणि परदेशात अनेक प्रोजेक्ट हाताळत आहेत. हे घडले ते त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याच्या निश्चयामुळे, त्यांच्या धोका पत्करण्याच्या तयारीमुळे. त्यांनी खेचून आणलेल्या टर्निंग पॉइंटमुळे.
सुरुवातीच्या काळात त्यांना अल्पकाळ शिक्षकाची नोकरीही करावी लागली. त्यानंतर आधी रोह्याच्या सुदर्शन केमिकल्समध्ये इन्स्ट्रुमेंटेशन सुपरवायझर म्हणून त्यांना त्यांच्या क्षेत्रातील पहिली नोकरी मिळाली. इन्स्ट्रुमेंटेशन ही इंजिनीअरिंगची एक फार मोठी आणि महत्त्वाची शाखा आहे. तिचे काम आहे रासायनिक वा कोणत्याही उत्पादन प्रक्रियेवर परिणाम करणारे निरनिराळे घटक मोजणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे.
कोणत्याही कारखान्यात जेव्हा उत्पादन प्रक्रिया घडते तेव्हा ती अनेक निकषांवर तपासावी लागते. तापमान, दाब, घनता, द्रव पदार्थांचा प्रवाह या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्या लागतात. तरच उत्पादन चांगले निघते. या सगळ्या गोष्टींचे निदर्शक किंवा पॅरामीटर्स असतात. प्लांट उभारतानाच ते मोजण्याची व नियंत्रित करायची सोय केलेली असते. देवराम गागरे जेव्हा सुदर्शन केमिकल्समध्ये जॉइन झाले तेव्हा त्यांना कामाची गरज म्हणून इन्स्ट्रुमेंटेशन या शाखेचा अधिक अभ्यास करावा लागला. त्यानंतर त्यांनी अनेक नोकऱ्यांमधून इन्स्ट्रुमेंटेशन या क्षेत्रातले सर्वांगीण ज्ञान मिळाले. त्यातले तज्ज्ञ बनले. त्यांची शेवटची डीएमसी या सल्प्युरिक आम्ल व सुपर फॉस्फेट हे खत बनवणाऱ्या कंपनीत होती. तिच्यात ते उच्च पदावर होते. कंपनीच्या प्रस्तावित प्लांट्सचे इन्स्ट्रुमेंटेशन त्यांना डिझाइन करावे लागे. ही नोकरी सुखवस्तू होती. त्यांना अनेक सुविधा होत्या. तिथे पूर्ण आयुष्य काढणेही त्यांना शक्य होते. एखादा अल्पसंतुष्ट माणूस तिथे रमला असता पण देवराम गागरे त्यात संतुष्ट नव्हते. हळूहळू त्यांना जाणवले की त्यांच्या क्षमतेचा नोकरीत पूर्ण वापर होत नाहीये. तोचतोचपणा आलाय. कोंडी झाली आहे. जर आपण व्यवसाय केला तर आयुष्यात यापेक्षा बरेच काही मिळवू शकू. तेव्हा त्यांचे वय ४० होते. जर नवा व्यवसाय सुरू करायचा तर हीच योग्य वेळ आहे. नंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यावर ते जमले नसते. म्हणून कंपनीला पुरेशी पूर्वसूचना देऊन त्यांनी नोकरी सोडली.
के. डी. इन्स्ट्रुमेंट्स ही स्वत:ची कंपनी स्थापन केली. सुरुवातीला त्यांना कठोर संघर्ष करावा लागला. त्यांच्या एका जुन्या सहकाऱ्याने त्यांना पहिला मोठा ब्रेक दिला. ग्वाल्हेरच्या फ्लेक्स केमिकल्सचे काम त्यांना मिळाले. तेव्हाही फायनान्सच्या बाबतीत त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. दुसरे काम जुन्या ओळखीनेच सिल्व्हासामध्ये मिळाले. त्या कामांतून त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहिले. आवश्यक ती उपकरणे घेता आली. प्रोफाइल बनली. गुडविल आणि क्रेडिट निर्माण झाले. त्यानंतर मात्र त्यांनी कधी मागे वळून बघितले नाही. आता त्यांची कंपनी मोठमोठ्या प्लांट्सच्या इन्स्ट्रुमेंटेशनची कामे करतात. त्यांनी थरमेक्स, फर्नेस फॅब्रिका, अलोक इंडस्ट्रीज, गार्डन सिल्क, जे. बी. एफ., सिल्व्हासा अशा कंपन्यांचे प्लांट उभारून दिले आहेत. अनेकदा टर्न की बेसिसवर इतरांनी घेतलेल्या कामातील इन्स्ट्रुमेंटेशनचा भाग त्यांच्यावर सोपवला जातो. कपडे बनवणाऱ्या कंपन्यांच्या प्लांट्सच्या बाबतीत ते प्रसिद्ध आहेत. भारताबाहेर त्यांनी दुबई, तुर्कस्तान, सौदी, कतार, ट्युनिशिया, मोरोक्को, काँगो, झांबिया, जॉइन या देशांतही त्यांनी कामे पूर्ण केली आहेत. यातली काही कामे त्यांना थेट मिळाली होती तर काही त्यांनी इतरांसाठी केली. काही उपकरणांचे ते ट्रेडिंगही करतात. गेल्या वीस वर्षांच्या वाटचालीमुळे इन्स्ट्रुमेंटेशनच्या क्षेत्रात आता त्यांच्या के. डी. इन्स्ट्रुमेंट्स या कंपनीचे मोठे नाव आहे. कंपनीचा व्याप खूप वाढला आहे. तो सांभाळण्यासाठी आता त्यांचे दोन सुपुत्र किशोर व मंगेश त्यांना मदत करतात.

२ जून १९५५ रोजी नगर जिल्ह्यातील वनकुटे या लहानशा खेड्यात जन्मलेले देवराम गागरे यांच्या घरात उच्चशिक्षणाची कोणतीही परंपरा नव्हती. त्यांचे जन्मगाव इतके मागास होते की पाचवीपासूनच परगावी राहून शिक्षण घ्यावे लागले. ज्या काळात शिक्षणाचा फारसा प्रभाव नव्हता त्या काळात ते एम.एस.सी. विथ इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत शिकले.

नोकरी की व्यवसाय या दोन पर्यायांतून गागरे यांनी व्यवसाय निवडला. धंद्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे नव्हते. व्यावसायिक म्हणून सांगायला काही पूर्वानुभव नव्हता. संभाव्य क्लायंटला दाखवायला पूर्वी केलेली कामे नव्हती. बाजारात पत नव्हती. त्यांच्याकडे कुशल कामगार नव्हते. अगदी या व्यवसायाला जी काही मूलभूत उपकरणे लागतात तीसुद्धा त्यांच्याकडे नव्हती. मार्केटिंगपासून ते काम करण्यापर्यंत सर्व गोष्टी त्यांना एकट्यालाच सांभाळाव्या लागत.

Web Title: Break the chakra, break the new regime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.