वसई : शनिवारी संध्याकाळी वहिनी तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शिरसाड, मांडवी, चादीप, उसगाव, शिवणसई, पारोळ, शिपली, सायवन, भाताणे मेढे या गावांमध्ये वीजेवर चालणारी उपकरणे ऐन कामाच्या वेळी बंद पडून नागरिकांची मोठी गैरसोय झाली.नालासोपारा व विरार येथून या भागाला वीजपुरवठा केला जातो. तिच पारोळमध्ये तुटल्याने या भागातील पुरवठा खंडीत झाल्याचे वीज कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पण या भागात वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहक वाहिन्या या झाडाझुडपातून जात असून त्यामुळेच झाडाच्या फांद्या किंवा झाड पडून नेहमी या भागातील वीजवहिन्या तुटतात. पण या बाबींकडे वीज महामंडळ नेहमी दुर्लक्ष करीत आहे. जर वीजवाहक वाहिन्यांची पाहणी करून धोकादायक असणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडल्या तर अशी घटना पुन्हा घडून नागरिकांची गैरसोय होणार नाही. त्याचप्रमाणे वीजवाहिनी तुटल्यामुळे ती तत्काळ दुरूस्त करण्यासाठी पारोळ उपकेंद्राकडे मनुष्यबळ कमी आहे. या बाबीचा विचार वीज महावितरणने करून असा प्रकार पुन्हा घडणार नाही, याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वीजग्राहक करीत आहेत. (वार्ताहर)
वसई पूर्वेला वाहिनी तुटल्याने वीज खंडित
By admin | Published: February 01, 2015 11:42 PM