Join us

प्रकल्पाच्या नावे होणारी वृक्ष छाटणी रोखली, मेट्रोच्या प्रस्तावालाही ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 3:12 AM

उच्चभ्रू वसाहतीचा विकास, रेल्वे मार्ग अशा विकासकामांच्या नावाखाली मुंबईतील झाडांची सर्रास छाटणी सुरू आहे. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असल्याने अखेर झाडे कापण्याचे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाने प्रशासनाकडे परत पाठवले आहेत.

मुंबई : उच्चभ्रू वसाहतीचा विकास, रेल्वे मार्ग अशा विकासकामांच्या नावाखाली मुंबईतील झाडांची सर्रास छाटणी सुरू आहे. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असल्याने अखेर झाडे कापण्याचे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाने प्रशासनाकडे परत पाठवले आहेत. यामध्ये केवळ कांदिवली येथील नाला रुंदीकरणाच्या मार्गात अडथळा ठरणारी झाडे कापण्याची परवानगी समितीने दिली आहे. हे प्रस्ताव परत पाठविताना शिवसेनेने पुन्हा एकदा मेट्रोचे प्रस्ताव उडवून भाजपाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुंग लावला आहे.नेपियन्सी रोड येथील उच्चभ्रू लोकवस्तीत एका इमारतीच्या बांधकामात अडथळा आणणारी २६ झाडे कापण्यास, तर १५ झाडे पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव होता. या इमारतीच्या भूखंडावर एकूण ६२ झाडे असून, त्यापैकी २१ झाडे आहेत तशीच ठेवली जाणार आहेत. तर सांताक्रूझ ते मिलन सबवे दरम्यान पश्चिम रेल्वेच्या प्रस्तावित सहाव्या मार्गामध्ये अडथळा ठरणारी ५४ झाडे कापण्याचे व ४७ झाडे पुनर्रोपित करण्याचे प्रस्तावित आहे. या ठिकाणी २१२ झाडे असून, त्यापैकी १११ झाडे आहेत तशीच ठेवली जाणार आहेत. रेल्वेकडून कापण्यात आणि पुनर्रोपित करण्यात येणारी झाडे १५ दिवसांमध्ये रेल्वे वसाहतीच्या मोकळ्या जागेत लावण्यात येतील, असे प्रतिज्ञापत्र रेल्वे प्रशासनाने महापालिकेला सादर केले आहे. पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या पटलावर मंजुरीसाठी मंगळवारी आणला होता.अशा पद्धतीने झाड कापण्याची परवानगी मागणारा हा पहिलाच प्रस्ताव नाही. वृक्ष प्राधिकरणाच्या गेल्या बैठकीतही सुमारे ४०० झाडे कापण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. यामध्ये मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पात बाधित वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावाचा समावेश होता. मात्र, पूर्वीपासून मेट्रोला विरोध असल्याने सत्ताधारी शिवसेनेने या सर्व ठिकाणच्या झाडांच्या पाहणीची मागणी करीत प्रस्ताव लांबणीवर टाकले होते. वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंगळवारी हे प्रस्ताव परत चर्चेला आले असता, सदस्यांनी हे प्रस्ताव फेरविचारार्थ पाठविले आहेत. यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या मार्गाला पुन्हा ब्रेक लागला आहे.असे आहेत वृक्ष तोडण्याचे प्रस्ताव- वांद्रे पूर्व येथील बीकेसीमधील भारतनगर रोड ते वाल्मीकीनगर ते पोलीस बीट चौकीपर्यंतच्या नियोजित रस्त्याच्या बांधकामात, तसेच पर्जन्य जलवाहिनीच्या कामात अडथळा ठरणारे ५४ वृक्ष तोडणार; यापैकी ३२ वृक्षांचे पुनर्रोपण होणार आहे.- मुंबई मेट्रो स्थानकाच्या विकासासाठी ३८ वृक्ष तोडणार, २३ वृक्षांचे पुनर्रोपण करणार.- चारकोप-मालाड येथील मेट्रो दोन-अ, चारकोप डेपो व वर्कशॉपच्या बांधकामात अडथळा ठरणारे ३७२ वृक्ष तोडणार, २२ पुनर्रोपित करणार.- कांदिवली पूर्व येथील मार्गिकेच्या प्रस्तावित बांधकामात अडथळा ठरणारे १६८ वृक्ष तोडणार, ११० पुनर्रोपित करणार.- बोरीवली पश्चिम येथील चंदावरकर नाल्याच्या सुधारणा व बांधकाम करण्याच्या कामात अडथळा ठरणारे १३५ वृक्ष तोडणार, ८५ पुनर्रोपित करणार.- कांदिवली पूर्व येथील गौतमनगर नाल्याच्या बांधकामात बाधित १६९ वृक्ष तोडणार, ३५ पुनर्रोपित करणार.- बोरीवली पूर्व येथील बीसीटी-बीव्हीआय मार्गिकेमधील प्रस्तावित पुलाच्या बांधकामात अडथळा ठरणारे ६९ वृक्ष तोडणार, ५२ पुनर्रोपित करणार.- नेपियन्सी रोड येथील इमारतीच्या बांधकामात अडथळा ठरत असल्याने तोडण्यात येणाºया झाडांमध्ये चिकू, रिटा, चाफा, सोनचाफा, शेवगा, आंबा, अशोक, सुपारी, कैलास पत्ती झाडांचा समावेश आहे.- रेल्वे मार्गात अडथळा ठरल्याने कापण्यात येणाºया झाडांमध्ये पिंपळ, जंगली उंबर, चिंच, नारळ, शेवगा, इत्यादी झाडांचा समावेश आहे.

टॅग्स :मुंबई