अतिधोकादायक १५९ इमारतींचा वीज, पाणीपुरवठा खंडित करा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 02:16 AM2019-05-18T02:16:50+5:302019-05-18T02:23:10+5:30
मान्सूनला जेमतेम काही दिवस उरले असताना पावसाळापूर्व कामे मात्र धीम्या गतीने सुरू आहेत. त्यामुळे धोकादायक इमारत, दरडींचे भय कायम आहे.
मुंबई : मान्सूनला जेमतेम काही दिवस उरले असताना पावसाळापूर्व कामे मात्र धीम्या गतीने सुरू आहेत. त्यामुळे धोकादायक इमारत, दरडींचे भय कायम आहे. याची गंभीर दखल घेत अतिधोकादायक ३९८ इमारतींपैकी १५९ इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सोबतच दरड कोसळून दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेऊन या परिसरांकडे विशेष लक्ष देण्याची सूचनाही केली.
आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात शुक्रवारी सर्व प्राधिकरणांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत धोकादायक इमारतींसह दरड परिसरांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावे, असे आयुक्तांनी सांगितले.
दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून निष्पाप जिवांचे बळी जातात. त्यामुळे या इमारती पावसाळ्यापूर्वी खाली करण्यावर पालिकेचा भर असतो. मात्र, रहिवाशी स्थलांतरित होण्यास तयार होत नाहीत. त्यात यावेळेस लोकसभा निवडणुकीमुळे अशा इमारतींची यादी जाहीर करण्याचे काम रखडले होते.
आयुक्तांनी अतिधोकादायक ३९८ इमारतींपैकी १५९ इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस पोलीस आयुक्त संजय बर्वे, मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे प्रबंधक एस. के. जैन, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, ए. एल. जºहाड, डॉ. अश्विनी जोशी, बेस्टचे उप महाव्यवस्थापक आर. जे. सिंग, म्हाडा, एम.एम.आर.डी.ए., पश्चिम व मध्य रेल्वे, हवामान खाते आदी विविध संस्था, प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
इमारत व दरड परिसर
- एन विभागात (घाटकोपर) ६४, के/पश्चिम (अंधेरी व जोगेश्वरी पश्चिम)- ५१ व टी विभागात (मुलुंड) ४७ इमारती अतिधोकादायक आहेत.
- १९३ इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट, तर ४६ इमारती तांत्रिक सल्लागार समितीच्या अंतर्गत आहेत. १५९ इमारतींचे वीज व जल जोडणी तोडणार.
- दरडी कोसळण्याची भीती असलेल्या ठिकाणांबाबत जनजागृती, तसेच म्हाडा व जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधून संरक्षक भिंती व जाळ्या बसविण्यात येणार आहेत.
चौपाट्यांवरही नजर
सर्व चौपाट्यांवर मिळून ९३ जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. बीच सेफ्टीसाठी जेट स्की, पॉवरबोट उपलब्ध करण्यात आल्या आहेत. चौपाटीसाठी अग्निशमन केंद्र येथे पॉवरबोट, जेट स्की आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ येत्या आठवडाभरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अशी होणार पावसाळापूर्व कामे
- नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागल्यास पालिकेच्या शाळा तात्पुरती निवासस्थाने म्हणून सुसज्ज ठेवणार.
- पावसाळ्यात झाडे उन्मळून पडू नयेत, म्हणून वृक्षांची प्राधान्याने छाटणी.
- आरोग्य यंत्रणा पालिका रुग्णालयात कार्यान्वित करण्यात येत आहे. मलेरिया व डेंग्यूसारख्या आजारांच्या नियंत्रणाकरिता जनजागृती कार्यक्रम.
- भारतीय नौदल, लष्कर, तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांना आपत्कालीन परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी समन्वय व आवश्यक सामग्रीचा पुरवठा.
- रेल्वे प्राधिकरणाशी समन्वय साधून रेल्वे मार्गातील अडथळा ठरणारी झाडे, कचरा आणि अतिक्रमणे हटविणे.
- सर्व मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या बसविणे, पार्किंगच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटविणे.