Join us  

उन्हाळ्यात मुंबईचे पाणी तोडू!

By admin | Published: January 25, 2016 1:24 AM

मुंबईची तहान भागविणाऱ्या शहापूर तालुक्याच्या पाणीप्रश्नाकडे राज्य सरकारने सतत दुर्लक्ष केले आहे. मुंबई महापालिकेनेही आमच्या तोंडाला कायमच पाने पुसली.

शहापूर : मुंबईची तहान भागविणाऱ्या शहापूर तालुक्याच्या पाणीप्रश्नाकडे राज्य सरकारने सतत दुर्लक्ष केले आहे. मुंबई महापालिकेनेही आमच्या तोंडाला कायमच पाने पुसली. आता बाहुली धरणाच्या पाण्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न सुटला नाही, तर येत्या उन्हाळ्यात मुंबईला जाणारे भातसाचे पाणी दोन दिवस तोडू आणि आमच्या प्रश्नाकडे मुंबईकरांचे लक्ष वेधू. पाण्याची टंचाई काय असते, ते त्यांना दाखवून देऊ, असा इशारा आमदार पांडुरंग बरोरा यांनी दिला.इगतपुरीतील बाहुली धरणात जूनपर्यंत ४० टक्के पाणी शिल्लक राहते. त्यातील २५ टक्के पाणी आम्ही मागतो आहोत. गुरुत्वाकर्षणाच्या आधारे फारसा खर्च न करता ते आम्हाला मिळू शकते. या योजनेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. महिनाअखेरीस त्याचा अहवाल येईल. सहासहा महिने पाण्यासाठी वणवण करणाऱ्या आमच्या तालुक्याची ही योजना येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मान्य झाली नाही, तर आम्ही शांत बसणार नाही. येत्या उन्हाळ्यात दोन दिवस मुंबईचे पाणी तोडून आम्ही त्यांनाही पाणीटंचाई काय असते, ते दाखवून देऊ, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकार आणि मुंबई पालिकेला या प्रश्नाची स्पष्टपणे जाणीव करून दिली. बरोरा यांनी आयोजित केलेल्या शहापूर महोत्सवात ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर, ‘लोकमत’चे सहयोगी संपादक मिलिंद बेल्हे, या प्रश्नावर सातत्याने लढा देणारे कुणबी सेनेचे नेते विश्वनाथ पाटील यांच्यासह विविध मान्यवर परिसंवादात सहभागी झाले होते. इगतपुरीचे कवी तुकाराम धांडे यांच्या टंचाईग्रस्तांच्या वेदना मांडणाऱ्या कवितेने या परिसंवादाला सुरु वात झाली. सूत्रसंचालक प्रकाश परांजपे यांनी मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी शहापूर तालुक्यात बांधलेल्या तानसा, वैतरणा आणि भातसा धरणांचा थोडक्यात आढावा घेऊन शहापूर, भिवंडी, मुरबाड, वाडा तालुक्यांतील गावपाड्यांना बसणाऱ्या पाणीटंचाईच्या झळांचा संदर्भ दिला. पाण्याच्या या लढ्यात आता लोकांच्या सहभागाची आवश्यकता आहे, अशी भूमिका मांडून ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी मुंबई पालिकेने शहापूर तालुका दत्तक घ्यावा, अशी भूमिका २५ वर्षांपूर्वी मांडल्याचा संदर्भ दिला. मुंबईत गाड्या धुण्यापासून सर्वत्र शुद्ध पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आणून पिण्याच्या पाण्याच्या गैरवापराबद्दल, त्याच्या व्यावसायिक वापरातून पालिका पैसे कमवत असल्याबद्दल न्यायालयात दाद मागायला हवी, अशी भूमिकाही त्यांनी घेतली. पाणीटंचाईचा विषय आला की, वर्षानुवर्षे मोखाडा आणि शहापूर हे दोन तालुकेच हमखास येतात. शहापूरचा पाणीप्रश्न का पेटलाय, ते आधी समजून घेतले पाहिजे. मुंबईची तहान जशी दिवसेंदिवस वाढेल, तशीच नागरीकरणाच्या उंबरठ्यावरील शहापूरचीही वाढेल. त्यामुळे मुंबईत पाण्याचा योग्य वापर आणि शहापूरला न्याय देण्यासाठी मुंबईकरांत जागृती, यावर भर द्यायला हवा, असे मत मिलिंद बेल्हे यांनी मांडले. मुंबईची तहान भागविण्यासाठी शहापूर, मुरबाडपाठोपाठ वाडा तालुक्यातही धरणे बांधून या भागाला तहानलेले ठेवून येथील ठाणे जिल्ह्याचे पाणी पळवण्याचा-ग्रामीण पट्टा संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमचे पाणी आम्हाला विकत घेण्याची वेळ आली आहे. आता तर हे पाणी गुजरातला नेण्याचा घाट घातला जात आहे. २५ वर्षे लढूनही सरकार काहीच करत नसल्याबद्दल विश्वनाथ पाटील यांनी संताप व्यक्त केला. कवी प्रशांत मोरे यांच्या पाण्याची व्यथा मांडणाऱ्या कवितेने परिसंवादाची सांगता झाली.