एसटीच्या प्रवाशांसाठी ३० रुपयांत नाश्ता... बोर्ड पडलाय अडगळीत, प्रवाशांची लुटमार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 08:44 AM2023-12-25T08:44:14+5:302023-12-25T08:45:16+5:30

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.

breakfast for st passengers at rs 30 | एसटीच्या प्रवाशांसाठी ३० रुपयांत नाश्ता... बोर्ड पडलाय अडगळीत, प्रवाशांची लुटमार

एसटीच्या प्रवाशांसाठी ३० रुपयांत नाश्ता... बोर्ड पडलाय अडगळीत, प्रवाशांची लुटमार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): तुम्ही एसटीने लांबचा प्रवास करत आहात. द्रुतगती मार्गावर एसटी वेगाने धावत असताना मध्येच एक झोकदार वळण घेत कोणत्याशा हॉटेलाजवळ थांबवली जाते. गाडी पंधरा मिनिटे थांबणार आहे, कोणाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर करून घ्या, असे कंडक्टर सांगतो. त्यानंतर खाली उतरून हॉटेलात गेलात की तुमच्यासमोर मेन्यू कार्ड दिले जाते. त्यातील पदार्थांचे दर अवाच्या सव्वा असतात. पाण्याची बाटलीही महागडी असते. नाइलाजास्तव पदार्थ पोटात ढकलले जातात, पण तिथेच कुठे तरी अडगळीत एक बोर्ड पडलेला असतो, ‘एसटीच्या प्रवाशांसाठी ३० रुपयांत नाश्ता’, असे लिहिलेला. त्याकडे लक्ष जाणार नाही, अशा पद्धतीने त्या बोर्डाला कोपऱ्यात ढकललेले असते. हे मुद्दाम केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. 

प्रवाशांसाठी अधिकृत थांब्यांवर ३० रुपयांत चहा-नाश्त्याची सोय एसटी महामंडळाकडून केली जाते. मात्र, अनेक ठिकाणी त्याचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. महामंडळाने त्यांची दखल घेत कारवाईचे आदेशही दिले होते. मात्र, तरीही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. बसस्थानकातील हॉटेल चालक जास्तीचे दर घेऊन नाश्ता देत असेल तर त्याची तक्रार एसटी महामंडळाकडे करता येते.

 ३० रुपयांत काय? 

एसटीच्या प्रवाशांसाठी करार करण्यात आलेल्या खासगी हॉटेलमध्ये शिरा, पोहे, उपमा, वडा पाव, इडली  आदींपैकी एक पदार्थ आणि चहा असा नाश्ता ३०  रुपयांना द्यावा लागतो. एसटी महामंडळाचे ‘नाथजल’ या मिनरल वॉटरच्या बाटलीसाठी १५ ऐवजी २० रुपये आकारण्यात येतात. विक्रेत्याने छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारू नये, असे आदेश महामंडळाने दिले आहेत. परंतु  या ठिकाणी पाण्याची बॉटल २० ची असेल तर २५ रुपयांना दिली जाते. 

आगार व्यवस्थापकांवर जबाबदारी

सध्या नाताळ सुट्यांचे दिवस असल्याने एसटीच्या गाड्यांना गर्दी आहे, तर दुसऱ्या बाजूला एसटी प्रवाशांना एसटी महामंडळाच्या या योजनांचा फायदा होताना दिसत नाही. ठरलेल्या दरात नाश्ता आणि नाथजल उपलब्ध नसल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. त्यामुळे आता एसटी महामंडळाने वाहतूक पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापकांवर जबाबदारी निश्चित केली, त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

अहमदनगरवरून मुंबईला येणाऱ्या बस लोणावळ्यातील निशीसागर फूड प्लाझा येथे थांबविण्यात आली होती. बाहेरगावचे प्रवासी राहत असल्याने ते जास्त भाव करू शकत नाही, तसेच जवळ असलेल्या हॉटेलमध्ये थोडाफार नाश्ता करून बसमध्ये बसण्याची घाई असते. याचा गैरफायदा हॉटेल चालक उचलतात.  खरे तर त्यांनी प्रवाशांना सवलतीत नाश्ता देणे आवश्यक आहे. मात्र, अधिकचे पैसे वसूल केले जातात. - सुजित कदम, प्रवासी 

संबंधित एसटीच्या अधिकृत थांबा असलेल्या हॉटेलची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. -  जयेश बामणे, महाव्यवस्थापक (नियोजन व पणन )
 

Web Title: breakfast for st passengers at rs 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.