मुंबई: लोकल बंद असल्याने खाजगी क्षेत्रातील महिलांचे कामावर जाताना अतोनात हाल होत आहेत. वाहतूककोंडीत तासन्तास अडकून पडावे लागत असल्याने त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे त्यांना वेळेचे नियोजन करून लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महिलांकडून करण्यात आली होती. महिलांच्या या मागणीचा विचार करत राज्य सरकारने रेल्वेला पत्र लिहिलं आहे.
मुंबई लोकलने महिलांना प्रवास करण्यास मुभा देण्याची विनंती राज्य सरकारने रेल्वेकडे केली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून (17 ऑक्टोबर ) महिलांना दोन टप्प्यांत लोकलने प्रवास करण्यास मुभा द्या, असं विनंतीपत्र राज्य सरकारने रेल्वे बोर्डला केलं आहे. या पत्रामध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आणि संध्याकाळी 7 नंतर अशा दोन टप्प्यांत महिलांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची ही विनंती रेल्वे मान्य करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महिलांसाठी रेल्वे सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव आला आहे. तो प्रस्ताव आम्ही रेल्वे बोर्डाकडे पाठवू रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर महिलांसाठी रेल्वे सुरू करण्याबाबतचा निर्णय जाहिर केला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
कोरोना विषाणूच्या फैलावास सुरुवात झाल्यानंतर बंद करण्यात आलेली मुंबईतील उपनगरीय लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकलेली नाही. सध्या लोकल प्रवास फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी म्हणजेच पोलीस, नर्स, डॉक्टर, पालिकेचे सफाई आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद आहे. त्यामुळे दररोज कामावर जाणाऱ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उपनगरीय रेल्वेतून दररोज साडेतीन लाख अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करत आहेत. यामध्ये पश्चिम रेल्वेतून सरासरी 3 लाख 30, तर मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेतून सरासरी 1.50 लाख कर्मचारी प्रवास करत आहेत. यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारमधील कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी आणि खासगी तसेच सहकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.