मुंबई: भाजपाने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन भाजपा सत्तास्थापन करणार नसल्याचे भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या या निर्णयानंतर शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत तातडीने मातोश्रीवर दाखल झाले आहे. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरल्याने राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र भाजपाकडे सत्तास्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा नसल्याने सरकार स्थापन करण्यास त्यांनी नकार दिला आहे. यामुळे आता राज्यपाल 56 जागा जिंकून निवडणुकीत दूसरा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला राज्यपाल सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं जाऊ शकतं. त्यामुळे शिवसेनेकडून जोरदार तयरी करण्यात येत आहे. त्यातचं शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण राज्यपालांनी द्याव असं मत व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष ठरूनही सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या वादावर अखेर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनाच रणांगणात यावे लागले आहे. राजभवनाच्या आवारात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाची भुमिका स्पष्ट केली.
विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत या महायुतीला जनतेने भरघोस जनादेश दिला. त्यामुळे राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले. शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी बरोबर येऊ इच्छित नाही. त्यामुळे आता आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही. हा जनादेश सोबत मिळून काम करण्यासाठीचा होता. शिवसेनेकडून त्याचा अपमान होत आहे. जनतेच्या जनादेशाचा अपमान करून शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करायचं असेल, तर ते करू शकतात, आमच्या शुभेच्छा, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.