BREAKING: चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 03:26 PM2019-07-16T15:26:08+5:302019-07-16T16:11:50+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मुंबई/नवी दिल्ली - भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी चंद्रकांत पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा केली. पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभेची निवडणूक भाजपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात लढवणार हे निश्चित झाले आहे.
Chandrakant Patil appointed as the President of Bharatiya Janata Party (BJP), Maharashtra. pic.twitter.com/Qoa8R3VBqX
— ANI (@ANI) July 16, 2019
रावसाहेब दानवे यांच्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर होते. नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपाला यश मिळवून देण्यासाठी कंबर कसली होती. तसेच बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात तगडा उमेदवरा उभा करून राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांच्या बालेकिल्ल्यातच कोंडी केली होती. पाटील यांच्या रणनीतीमुळे भाजपाला यावेळच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये लक्षणीय यश मिळाले होते. चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करतानाच भाजपाकडून स्वतंत्र देव सिंह यांची पक्षाच्या उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील हे फडणवीस सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जातात. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या पदांचा कार्यभार असून, पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे कृषिमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला होता.
दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आजआपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. तेव्हापासूनच ते प्रदेशाध्यक्षपद सोडतील, अशी चर्चा सुरू झाली होती.
Bharatiya Janata Party (BJP) Maharashtra President, Raosaheb Patil Danve resigns from his post. (file pic) pic.twitter.com/O02r27mZrF
— ANI (@ANI) July 16, 2019