काँग्रेसने आपल्या मुंबईतील पक्षसंघटनेत मोठा फेरबदल केला आहे. काँग्रेसने ज्येष्ठ नेते भाई जगताप यांची मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी केली असून, त्यांच्या जागी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी या नियुक्तीची घोषणा केली आहे. काँग्रेसने मुंबई बरोबरच गुजरात आणि पाँडेचेरीमध्येही नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे.
वर्षा गायकवाड ह्या काँग्रेसचे दिवंगत नेते एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. वर्षा गायकवाड ह्या मुंबईतील धारावी मतदारसंघातून सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. तसेच त्यांनी २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्याआधी आघाडी सरकारच्या काळात महिला आणि बालविकास मंत्री म्हणून काम पाहिले होते.
दरम्यान मुंबईच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर वर्षा गायकवाड यांच्यासमोर अनेक आव्हाने असतील. आगामी मुंबई महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या पक्षसंघटनेची बांधणी करण्याचं काम त्यांना करावं लागेल. तसेच महाविकास आघाडीमध्ये सुसंवाद राखून मुंबईत मविआ टिकवण्यासाठीही त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.