ठाकरे गट मुंबईत फोडणे शिंदे गटासाठी आव्हान
By अतुल कुलकर्णी | Published: July 20, 2023 11:26 AM2023-07-20T11:26:31+5:302023-07-20T11:27:13+5:30
मुंबईत निवडून यायचे असेल तर भाजप बरे : ठाकरे गटाचा विचार
अतुल कुलकर्णी
मुंबई : येऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे गटातील माजी नगरसेवकांना व नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचे जोरदार प्रयत्न शिंदे गटाकडून होत असले तरी, त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. आम्हाला शिंदे गटाकडून बोलावण्यात आले. मात्र मुंबईत तरी आम्ही असा कुठलाही निर्णय घेणार नाही, अशा प्रतिक्रिया माजी नगरसेवक व विद्यमान आमदार बोलून दाखवत आहेत. मुंबईत निवडून यायचे असेल तर ठाकरे गट किंवा भाजप बरे. ठाण्यात निवडून यायचे असेल तर शिंदे गट बरा, अशी विभागणी नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्यांच्या मनामध्ये आहे.
ठाकरे शिवसेनेची महिला आघाडी, ॲम्बुलन्स सेवा, स्थानिक लोकाधिकार समिती, कामगार सेना, युवा सेना, शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख या यंत्रणेत काम करणाऱ्या एकाही मोठ्या नेत्याला आपल्याकडे वळवण्यात शिंदे गटाला अद्याप यश आलेले नाही. अगदी सुरुवातीच्या काळात खा. राहुल शेवाळे आणि यशवंत जाधव, त्यांची पत्नी आ. यामिनी जाधव, राहुल कन्नान, नीलम गोऱ्हे, असे काही सोडले तर मुंबईतला संघटनेत काम करणारा अन्य मोठा नेता शिंदे गटाकडे आलेला नाही. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओमुळे भाजप चांगलाच अडचणीत आला आहे. त्यामुळे महिला वर्गात नाराजी तीव्र झाली आहे. परिणामी शिंदे गटाकडे जाऊ म्हणणाऱ्यांना या कारणामुळे ही ब्रेक लागल्याचे काही नेत्यांनी बोलून दाखवले.
उद्धव ठाकरे यांचे मुख्य प्रसिद्धी अधिकारी हर्षल प्रधान यांनी आपल्यालाही सरचिटणीसपदाची तसेच विधान परिषदेच्या उमेदवारीची ऑफर होती, असे सांगितले. मात्र आपण स्पष्ट शब्दात नकार दिल्याचे ते म्हणाले. शिवसेनेत वेळेवर शाखा उघडल्या जात आहेत. मोठ्या प्रमाणावर महिला आघाडीच्या सदस्या शाखेवर जात आहेत. हा मोठा बदल असल्याचे सांगून प्रधान म्हणाले, कार्यकर्त्यांच्या बळावर नेते निवडून येतात. कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. मुंबईतील मुस्लिमही ठाकरेंच्या बाजूने असल्याचा दावा प्रधान यांनी केला.
आम्ही कट्टर शिवसैनिक : अभिषेक घोसाळकर
मला, वडील व शिवसेना उपनेते, माजी आमदार डॉ. विनोद घोसाळकर आणि माझी पत्नी व माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी शिंदे गटात यावे म्हणून प्रयत्न केले गेले. मात्र आम्ही कट्टर शिवसैनिक असून किती आमिषे दाखवली तरी शिंदे गटात जाण्याचा प्रश्नच नाही, असे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी सांगितले.
वकिलांची टीम पाठवली: नांदगावकर
आपल्याकडे वकिलांची टीम पाठवली, पण आपण गेलो नाही असे शिवसेनेचे उपनेते नितीन नांदगावकर यांनी सांगितले. माजी महापौर किशोरी पेडणेकर, विधानपरिषदेचे आमदार विलास पोतनीस दोघांनी आपल्याला अनेक मार्गाने बोलावले पण आपण ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचे सांगितले. मी, माझी पत्नी व माजी नगरसेविका मंगला काते, सून व माजी नगरसेविका काते हे आमचे कुटुंब पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहोत. आम्हाला आमिषे दाखवली, पण शिंदे गटात जाण्याचा प्रश्नच नाही, असे माजी आ. तुकाराम काते यांनी सांगितले.
आगे आगे देखो होता है क्या : शीतल म्हात्रे
एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी मात्र वेगळीच माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ५० टक्क्यांहून अधिक माजी नगरसेवक शिंदे गटात यायला तयार असून, योग्य वेळी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करतील. मात्र त्यांची नावे आज सांगणार नाही. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या कामावर खूष होत ठाकरे गटाच्या २२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.