VIDEO - बाळाला स्तनपान करत असताना वाहतूक पोलीसाने गाडी नेली उचलून! मुंबईतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 08:44 PM2017-11-11T20:44:47+5:302017-11-11T22:01:31+5:30
डयुटीवर तैनात असलेल्या एका वाहतूक पोलीसाने महिलेच्या मातृत्वाचा अपमान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबई - डयुटीवर तैनात असलेल्या एका वाहतूक पोलीसाने महिलेच्या मातृत्वाचा अपमान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला तिच्या गाडीमध्ये सात महिन्यांच्या बाळाला स्तनपान करत असताना निर्दयी वाहतूक पोलीसाने गाडी टो करुन नेली. मुंबईत मालाडच्या एसव्ही रोडवर शनिवारी सकाळी ही घटना घडली. शशांक राणे अस या वाहतूक पोलीसाच नाव आहे. शशांक राणेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
ही महिला मदतीसाठी याचना करत होती. गाडी टो करुन नेणा-या ट्रकचा वेग कमी करायला ती सांगत होती. पण शशांक राणेने काहीही ऐकले नाही. या महिलेचा पती आणि त्याच्या मित्राने या घटनेचा व्हिडिओ काढला. महिला आणि तिचे सात महिन्यांचे मूल गाडीमध्ये बसलेले असताना वाहतूक पोलीस गाडी टो करुन नेत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
No the Policemen towing the car did not even once ask me to get down, even when I told them that I am breastfeeding my baby they still did not stop: Jyoti Male pic.twitter.com/HpYEapJK4j
— ANI (@ANI) November 11, 2017
महिलेचा पती शशांक राणे उत्तर दे असे सांगत होता. तो आवाजही या व्हिडिओमध्ये आहे. मुलाला काही झाले तर कोण जबाबदार ? असा सवाल या महिलेचा पती विचारत होता. या महिलेची गाडी ज्या ठिकाणाहून टो केली तिथे आणखी दोन कार उभ्या होत्या. पण वाहतूक पोलिसाने आपलीच गाडी उचलली असे या महिलेने सांगितले. वाहतूक पोलीस ही कार घेऊन मालाड पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे गाडी मालकावर दंड आकारुन गाडी सोडून देण्यात आली. महिला आणि तिच्या मुलाची प्रकृती चांगली आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायर झाल्यानंतर वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रविवारपर्यंत चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.