मुंबई : भावासारखे प्रेम देणाऱ्या मालकिणीचा जीव धोक्यात असल्याचे समजताच लकी नावाच्या श्वानाने हल्लेखोरावर झडप घातली. यामध्ये स्वत:चा जीव गमावून मालकिणीसह अन्य एका तरुणीचा जीवही त्याने वाचवला. ही घटना सायन कोळीवाड्यातील आहे. सायन कोळीवाड्यातील मक्कावाडीत सुमती तंगवेल देवेंद्रा (२८) ही तरुणी नशेखोर भाऊ आणि १३ महिन्यांच्या लकी नावाच्या श्वानासोबत राहते. वडिलांच्या निधनानंतर दीड वर्षांनी तिच्या आईचेही निधन झाले. त्यानंतर पुढील काही महिन्यातच तिच्या दारात कोणीतरी श्वानाचे पिल्लू सोडून गेले. तिने त्याला घरात घेतले. त्याला मोठे केले. पाहता पाहता हा श्वानच तिच्यासाठी सर्वस्व ठरला. त्यामुळे तिने त्याचे नाव लकी ठेवले. परिसरातील कोणी तिची छेड काढली तरी तो त्यांच्या अंगावर धाऊन जाई. लकीमुळे तिच्याकडे कोणी वर नजर करुन पाहण्याची हिंमत करत नसे. अनोळखी व्यक्तींना तर घरात थाराच नसे. रविवारी रात्री सुमतीच्या शेजारी राहणाऱ्या रेसीचा तिच्या बहिणीचा प्रियकर व्यंकटेश चेलप्पासोबत वाद झाला. व्यंकटेशने रेसीला मारहाण केली. त्यानंतर चाकू घेऊन तिच्या मागे लागला. ते पाहून मदतीसाठी रेसीने घराबाहेर धाव घेतली. सुमतीच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने ती तिच्याकडे गेली. तिच्या मागून आलेल्या व्यंकटेशला सुमतीने दारातच अडविले. रागने त्याने सुमतीला मारहाण करत चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ते पाहून लकीने त्याच्या अंगावर झडप घातली आणि त्याच्या चाकूचा वार आपल्यावर घेतला. जखमी अवस्थेती लकीने त्याचा चावा घेताच त्याने पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लकीला पाहून सुमती कोसळली. तिने स्थानिकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात हलविले. मात्र, तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुमतीच्या तक्रारीवरुन अण्टॉप हिल पोलिसांनी व्यंकटेशला अटक करून नंतर त्याची जामिनावर सुटका केली. (प्रतिनिधी)न्याय मिळेल का?आरोपीने आमच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये माझा लकी माझ्यापासून हरपला. तरीही श्वानासाठीचा परवाना तुमच्याकडे आहे का, असे पोलीस विचारत आहेत. खरंतर आरोपीविरुद्ध् आणखीन कडक कारवाई करणे गरजेचे आहे. माझ्या लकीला न्याय मिळेल का? असा प्रश्न सुमतीने लोकमतशी बोलतानाउपस्थित केला. अधिक तपास सुरु...याप्रकरणी ४२९ गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली. प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. तपासात आणखीा काही आढळल्यास कलम वाढविण्यात येतील, अशी माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली.
अॅण्टॉप हिलमध्ये मालकिणीला वाचवण्यासाठी श्वानाने लावली प्राणांची बाजी
By admin | Published: April 14, 2017 2:32 AM