Join us  

दिवसातील १७ तास सर्वाधिक प्रदूषित हवेत घ्यावा लागतो श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:05 AM

खारघर, तळोजा, पनवेलमधील नागरिकांना त्रास; पांढरी फुफ्फुसे दहा दिवसांत पडली काळीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील ...

खारघर, तळोजा, पनवेलमधील नागरिकांना त्रास; पांढरी फुफ्फुसे दहा दिवसांत पडली काळी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वायू प्रदूषणात दिवसागणिक वाढ होत असून, वायू प्रदूषणाबाबत अभ्यास करत असलेल्या वातावरण फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, खारघर, तळोजा, पनवेल परिसरातील रहिवाशांना दिवसातील १७ तास सर्वाधिक प्रदूषित हवेत श्वास घ्यावा लागत आहे.

जानेवारी २०२१मध्ये वातावरण फाउंडेशनने खारघर येथे दाट वाहतुकीच्या चौकात फुफ्फुसांची मोठी प्रतिकृती बसवली होती. ती पांढऱ्या रंगाची प्रतिकृती दहा दिवसांत पूर्णपणे काळी पडली. याचा अर्थ येथील प्रदूषणात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत आहे. परिणामी वातावरण फाउण्डेशन येथील प्रदूषण कमी करण्यासाठी सातत्याने काम केले जात आहे. नवी मुंबईसोबतच मुंबईवरही भर देण्यात येत असून, या दोन्ही शहरांतील प्रदूषण कमी करण्यावर सातत्याने सरकारच्या भेटी घेत उपाय सुचविले जात आहेत.

दुसरीकडे कळंबोली भागात परिसरातील हवेची गुणवत्ता सतत तपासणारी यंत्रणा बसविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेकडून ना हरकत दाखला मिळाला आहे, असे उत्तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने माहिती अधिकाराखाली वातावरण फाउण्डेशनला दिले आहे. वातावरण फाउण्डेशन नियमितपणे तळोजा एमआयडीसीतील वायू प्रदूषणाचा खारघर, तळोजा, पनवेल शहर व कळंबोली येथील नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा मुद्दा मांडला आहे.

दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाने खारघर आणि तळोजा एमआयडीसी परिसरात हवेची गुणवत्ता तपासणी, नोंदणी करणारी यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव दिला आहे.

.........................