पदपथ घेणार मोकळा श्वास
By admin | Published: January 2, 2017 06:51 AM2017-01-02T06:51:50+5:302017-01-02T06:51:50+5:30
पदपथ हे पादचाऱ्यांसाठी असल्याने त्यावर अतिक्रमण खपवून घेणार नाही, असे ठणकावणाऱ्या महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी आपला शब्द अखेर खरा केला आहे
मुंबई : पदपथ हे पादचाऱ्यांसाठी असल्याने त्यावर अतिक्रमण खपवून घेणार नाही, असे ठणकावणाऱ्या महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी आपला शब्द अखेर खरा केला आहे. पदपथावर चालण्याचा हक्क पादचाऱ्यांना मिळवून देण्यासाठी महापालिकेने धोरण आणले आहे. त्यानुसार, पदपथांवरील स्टॉल्स, फेरीवाले आदी अतिक्रमणे कायदेशीर प्रक्रियेद्वारे हटविण्यात येणार आहेत, तसेच पदपथांवर यापुढे वाहन उभे करण्यास मनाई करण्यात येणार आहे.
पदपथांची अवस्था वाईट असल्याने, माझी इच्छा झाली तरी माझ्या वृद्ध आई-वडिलांना पदपथावरून चालण्यासाठी मला नेता येत नाही, अशी खंत खुद्द आयुक्तांनी गेल्या महिन्यात व्यक्त केली होती. पादचाऱ्यांना हक्काचा पदपथ मिळावा, यासाठी नवीन धोरण आखणार असून, सहायक आयुक्तांना त्यासाठी चाचपणी करण्यास सांगितले आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार, हे धोरण तयार झाले असून, याच्या अंमलबजावणीनंतर पदपथही मोकळा श्वास घेतील. पदपथांचे आकार, पादचाऱ्यांची संख्या अशा विविध बाबींचा अभ्यास करून या धोरणातील मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. पादचाऱ्यांची संख्या अधिक असणाऱ्या रेल्वे स्थानकांसारख्या भागात पदपथांची रुंदी अधिक ठेवणे, पदपथांची सलगता याचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर, पदपथांवरील २.२० मीटर भाग मोकळा ठेवणे बंधनकारक असेल, अशी माहिती रस्ते व वाहतूक खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली.
पदपथावर असणारे फायर हायड्रंट, विद्युत पेटी, दिव्याचे खांब, कचऱ्याचे डबे, झाडे, मार्गदर्शक फलक, दूरध्वनी पेट्या यांसारख्या अनेक बाबी या पदपथावरील स्ट्रीट फर्निचरच्या भागात असणार आहेत. या सर्व बाबी एकाच बाजूला असल्याने, पादचाऱ्यांना पदपथावरून चालणे व व्हील चेअर्स नेणे सुलभ होणार आहे.
पदपथावरील केवळ पादचाऱ्यांसाठी असणारा भाग हा किमान १.८० मीटर रुंदीचा असावा, तर या भागाच्या वरील २.२० मीटर एवढी जागा मोकळी ठेवणे बंधनकारक असणार आहे. या अंतर्गत पदपथापासून २.२० मीटर उंचीपर्यंतच्या जागेत कोणत्याही प्रकारचे फलक, छप्पर बसविता येणार नाही, जेणेकरून डोक्यावर काही सामान वाहून नेणाऱ्या व्यक्तीला विनाअडथळा जाता येईल. पदपथावर केवळ पादचाऱ्यांसाठी असणाऱ्या भागात उपयोगिता व अन्य कोणत्याही प्रकारचे तात्पुरते इतर स्वरूपाचे बांधकाम करता येणार नाही.
धोरणात काय...
पदपथांच्या वरील भागास भेगा, चढ-उतार असू नये, तसेच पदपथ हे घसरडे नसावेत.
वर्दळीच्या वेळी अथवा दिवसाच्या कोणत्याही वेळेत पादचाऱ्यांना योग्य प्रकारे पदपथांचा वापर करता येईल, एवढी पदपथांची रुंदी असावी.
पदपथावरील विजेचा खांब, झाड, मार्गदर्शक फलक, टपाल पेटी, कचरा पेटी यांसारख्या बाबी पदपथावर एकाच बाजूला असाव्यात, जेणेकरून पादचाऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे पदपथांचा वापर करता येईल.
फेरीवाले, विक्रत्यांचे स्टॉल्स, दूरध्वनी उपयोगिता, वाहनतळ यांसारख्या व्यावसायिक स्वरूपाच्या कार्यांसाठी पदपथांचा उपयोग होत असल्याचे आढळून येते. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथाचा सुयोग्य वापर करता यावा, यासाठी पदपथावरील विविध प्रकारची अतिक्रमणे कायदेशीर प्रक्रियेनंतर हटविण्यात येणार आहेत.
पदपथांवर वाहनतळ असल्यास पदपथावर होणारी वाहनांची वाहतूक ही पादचाऱ्यांना दृष्टीने धोकेदायक ठरू शकते. त्यामुळे पदपथावरील कोणत्याही वाहनतळाची नोंदणी अथवा पुनर्नोंदणी यापुढे केली जाणार नाही. अपवादात्मक परिस्थिती व दुर्मीळ प्रकरणांमध्ये अशा प्रकाराची परवानगी ही १५ दिवसांपेक्षा अधिक असणार नाही. त्यासाठी अतिरिक्त आयुक्तांची पूर्वपरवानगी आवश्यक असणार आहे.
पदपथावर कोणत्याही प्रकारचे तात्पुरत्या स्वरूपाचे ‘स्ट्रक्चर’ उभारण्यासाठी, यापुढे अतिरिक्त महापालिका आयुक्तांची पूर्वपरवानगी आवश्यक असेल, तसेच ही परवानगी देतानादेखील संबंधित पदपथावर १.५ मीटर एवढी जागा पादचाऱ्यांसाठी मोकळी सोडणे बंधनकारक असणार आहे.
पदपथ व रस्ते हे पूर्णपणे वेगळे राहावेत, यासाठी पदपथाच्या दोन्ही बाजूंना सुरक्षाखांब बसविणे; तसेच पदपथांची सलगता कायम ठेवण्यात येणार आहे.
पदपथांवरून चालण्यासाठी पादचाऱ्यांना प्राधान्य असायलाच हवे, यासाठी पदपाथाची रुंदी ही तीन भागांमध्ये विभागण्यात येईल, यातील साधारणपणे अर्ध्या मीटर रुंदीचा पहिला भाग ‘मृत भाग’ असेल, याच भागाला लागून दुसरा भाग असेल पादचाऱ्यांसाठी; तर तिसरा भाग स्ट्रीट फर्निचरकरिता असणार आहे.