Join us  

महिला वैमानिकांचे चित्तथरारक अनुभव

By admin | Published: March 11, 2017 2:59 AM

देशातील नामांकित महिला वैमानिकांनी आपल्या आठवणींना उजाळा देत चित्तथरारक अनुभव कथन केले. इंडियन वुमन पायलेट्स असोसिएशनने (आयडब्ल्यूपीए) शुक्रवारी

मुंबई : देशातील नामांकित महिला वैमानिकांनी आपल्या आठवणींना उजाळा देत चित्तथरारक अनुभव कथन केले. इंडियन वुमन पायलेट्स असोसिएशनने (आयडब्ल्यूपीए) शुक्रवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान या वैमानिकांनी आपले अनुभव सांगितले.आयडब्ल्यूपीए या महिला वैमानिकांच्या संघटनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने संघटनेने वर्षाखेरीस एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिषदेत आंतरराष्ट्रीय पातळीवरील महिलांसह देशातील एअरलाइन्स क्षेत्रातील नामांकित आणि अभ्यासू वक्ते मार्गदर्शन करतील. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मार्गदर्शन करावे, यासाठी संघटना प्रयत्न करत असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा आणि एअर इंडियाच्या अग्निशमन यंत्रणेच्या प्रमुख हरप्रीत सिंग यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, महिलांसाठी कोणत्याही सुविधा नसताना जिद्दीने प्रशिक्षण घेतले. पुरुष वैमानिकांसोबत घरासह शौचालय वाटून घ्यावे लागले. मात्र तरीही मी आणि माझ्या महिला सहकाऱ्यांनी मोठ्या जिद्दीने प्रशिक्षण घेत एअरलाइन्स क्षेत्रात नाम कमावले आहे. आयडब्ल्यूपीए संघटनेच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणींचे वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करत आहोत. त्यासाठी आवश्यक आर्थिक मदतही संघटना करत असल्याचे सिंग यांनी सांगितले.या परिषदेत देशाच्या पहिल्या महिला कमांडर सौदामिनी देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना परवाने मिळत असताना १७व्या वर्षी विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेता येत होते. खूप आवड असल्याने वयाच्या १७व्या वर्षीच प्रशिक्षण सुरू केले. त्या काळी अनुदानित प्रशिक्षणासाठी विमानांची कमतरता असल्याने तब्बल दोन वर्षे वाट पाहावी लागली. त्यानंतर विमान चालवण्याचा परवाना मिळाला. त्यानंतर संघर्ष करत अमेरिकेत जाऊन घेतलेल्या प्रशिक्षणाबाबतही देशमुख यांनी सांगितले. या वेळी मारवाडी समाजातील पहिल्या महिला वैमानिक आणि एअरबस ए३२०च्या पहिल्या परीक्षा नियंत्रक संगीता बांगर यांनीही आपले अनुभव कथन केले. (प्रतिनिधी)