Join us  

घरातच डेंग्यूच्या डासांची पैदास

By admin | Published: September 25, 2015 3:21 AM

गेल्या दोन वर्षांत एकूण डेंग्यूबाधित रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांच्या घरांमध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणाऱ्या एडीस इजिप्ती डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली आहेत

मुंबई : गेल्या दोन वर्षांत एकूण डेंग्यूबाधित रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांच्या घरांमध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणाऱ्या एडीस इजिप्ती डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली आहेत. या प्रकरणी जानेवारी ते आॅगस्ट २०१५दरम्यान १३,५८७ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ८६६ प्रकरणी न्यायालयीन कारवाई सुरू असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.जानेवारी ते आॅगस्ट २०१५ यादरम्यान ६२ लाख ७५ हजार २४७ घरांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ हजार ६११ ठिकाणी डेंग्यूबाधित स्थाने आढळून आली. १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट २०१५ या कालावधीदरम्यान जिथे डास उत्पत्ती स्थाने आढळून आली; अशा १३ हजार ५८७ ठिकाणांबाबत संबंधित व्यक्तींना नोटीस देण्यात आली. यांपैकी ८६६ प्रकरणी अपेक्षित कार्यवाही संबंधितांनी केली नाही. ज्यामुळे अशा प्रकरणी न्यायालयीन कार्यवाही केली आहे. (प्रतिनिधी)----------१ जानेवारी ते ३१ आॅगस्ट २०१५ या कालावधीत न्यायालयीन कार्यवाहीद्वारे २३ लाख ३८ हजार ४०० रुपये दंड वसूल केला. सप्टेंबर महिन्यात १ हजार ९५३ उत्पत्ती स्थाने शोधून नष्ट करण्यात आली आहेत. या उत्पत्ती स्थानांपैकी १,७७३ उत्पत्ती स्थाने इमारतींमध्ये आढळून आली. -----------घरामध्ये व घराशेजारील परिसरात साठविलेले किंवा साचलेले पाणी सात दिवसांपेक्षा अधिक काळ राहणार नाही; याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळावा.-----डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणाऱ्या एडीस इजिप्ती डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. या डासांच्या साठलेल्या पाण्यातील अवस्था साधारणपणे आठ दिवसांच्या असतात.---------घरातील पिंप, ड्रम, बादल्या, पाणी साठविण्याची भांडी यातील पाणी आठवड्यातून किमान एक वेळा पूर्णपणे बदलावे. कोरडी केलेली भांडी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावीत. जेणेकरून भांड्याला किंवा भांड्याच्या कडांना चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील.----------‘निरुपयोगी वस्तू नष्ट करा’टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, पत्रे, घरावर टाकलेले प्लॅस्टिक यांसारख्या विविध वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून डेंग्यूचे विषाणूवाहक डास अंडी घालतात. नागरिकांनी अशा निरुपयोगी वस्तू नष्ट कराव्यात---------------डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थाने । सर्वेक्षणानुसार फेंगशुई झाड, बांबू प्लॅन्टस, मनीप्लँटस यांसारखी शोभिवंत झाडे, घराच्या सज्जामध्ये किंवा सभोवताली झाडांच्या कुंड्यांमध्ये उत्पत्ती स्थाने आढळली आहेत; तसेच अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या ताटल्या, वातानुकूलन यंत्रणा, फ्रीजचा डिफ्रॉस्ट ट्रे यांसारख्या विविध बाबींमध्ये अल्प प्रमाणात असलेल्या स्वच्छ पाण्यातदेखील डेंग्यू विषाणूवाहक डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली आहेत.