अलिबाग : पोलादपूरमधील कृष्णा रुग्णालयाच्या नोंदणीकरिता दहा हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याचे सिद्ध झाल्याने, रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शारंगधर महादेवराव पंडित व त्याच्या कार्यालयातील आरोग्य कर्मचारी प्रफुल्ल विठ्ठलदास शहा यांना एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा रायगड जिल्हा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच.ए.पाटील यांनी मंगळवारी सुनावली आहे.पोलादपूर येथे डॉ.कुमार सखाराम सुकाळे यांचे कृष्णा रुग्णालय आहे. नर्सिंग होम कायद्यानुसार, या रुग्णालयाची रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे नोंदणी करणे आवश्यक होते. त्याकरिता डॉ. सुकाळे यांनी रीतसर अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे दाखल केला होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने आरोग्य कर्मचारी प्रफुल्ल शहा याने डॉ. सुकाळे यांच्या रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देवून संबंधित कागदपत्रांची छाननी केली होती. नोंदणी प्रमाणपत्र लवकर मिळावे, अशी विनंंती डॉ. सुकाळे यांनी शहा यांना केली असता, त्यांनी त्याकरिता २० ते २५ हजार रुपये खर्च करावा लागेल, असे सांगितले होते. त्यानंतर शहा यांनी ही रक्कम कमी करुन १२ हजार रुपयांवर आणली. अखेर डॉ. सुकाळे यांनी याबाबत रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या येथील कार्यालयात रीतसर तक्रार दाखल केली. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातच सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली.
लाचखोरांना सक्तमजुरी
By admin | Published: April 07, 2015 10:40 PM