लाचखोर हवालदाराकडे १२७ तोळे सोने
By admin | Published: February 1, 2015 01:59 AM2015-02-01T01:59:05+5:302015-02-01T01:59:05+5:30
गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी जाधव यांच्यासह तिघांना ठाणे लाचलुचपत विभागाने ५० हजारांची लाच घेताना अटक केली होती़
ठाणे : गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी जाधव यांच्यासह तिघांना ठाणे लाचलुचपत विभागाने ५० हजारांची लाच घेताना अटक केली होती़ यातील हवालदार प्रेमसिंग राजपूत याच्या ठाण्यातील एका बँक लॉकरमध्ये तब्बल १२७ तोळे सोन्याचे दागिने सापडले आहेत़ तसेच त्याच्याकडून १ लाख १९ हजार रुपयांची रोकडही ठाणे लाचलुचपत विभागाने जप्त केली आहे.
रॉकेल व फिनाइलची भेसळ करणारा टँकर सोडविण्यासाठी जाधव याच्यासह चार पोलिसांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत विभागाने अटक केली होती. वाडा येथील एका केमिकल कंपनीवर त्यांच्या पथकाने कारवाई केली होती. या कारवाईमध्ये एक टँकर पकडून काही मजुरांवर कारवाई केली होती. यात जप्त केलेली गाडी सोडविण्यासाठी तसेच मजुरांवर कारवाई न करण्यासाठी जाधव याने तक्र ारदाराकडे दोन लाख रु पयांची लाच मागितली होती.
या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्र ार दाखल केली होती. या तक्र ारीच्या आधारे सापळा रचून ५० हजारांचा पहिला हप्ता घेताना वागळे इस्टेट येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षक शहाजी जाधव, पोलीस हवालदार प्रेमसिंग जे. राजपूत, उदय शंकर कोरे, सुरेश सखाराम पाटील या चौघांना अटक केली. यातील एक आरोपी पोलीस हवालदार प्रेमसिंग राजपूत याच्या ठाण्यातील एका खाजगी बँकेत असलेल्या खात्याची ठाणे लाचलुचपत विभागाने तपासणी केली असता त्यांना त्याच्या लॉकरमध्ये घबाडच सापडले़ या लॉकरमध्ये १२७ तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख १९ हजार रुपयांची रोकड सापडली आहे. ठाणे पोलिसांच्या एका हवालदाराकडे इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळाल्याने आता सर्वांचेच डोळे चक्र ावले आहेत. या घटनेतील चारही आरोपींची पोलीस चौकशी करून कोट्यवधींचे घबाड मिळण्याची शक्यता आहे़