लाचखोर पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 03:03 AM2019-02-14T03:03:40+5:302019-02-14T03:03:50+5:30
गोवंडी पोलीस ठाण्यातील लाचखोर सहायक पोलीस निरीक्षकावरील कारवाईचे प्रकरण ताजे असतानाच, बुधवारी देवनार पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला.
मुंबई : गोवंडी पोलीस ठाण्यातील लाचखोर सहायक पोलीस निरीक्षकावरील कारवाईचे प्रकरण ताजे असतानाच, बुधवारी देवनार पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. दत्तात्रय गोविंद चौधरी (५०) असे त्याचे नाव असून, त्याने ३ लाखांची मागणी केली होती. त्यापैकी ८० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना बुधवारी एसीबीने त्याला रंगेहाथ अटक केली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार आणि त्याचा भाऊ, मित्र यांच्याविरोधात देवनार पोलीस ठाण्यात मारहाणीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यात तक्रारदारासह त्याच्या भावाला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र, या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी चौधरींकडे विनंती केली.
चौधरीने यासाठी ३ लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. त्यामुळे तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली. तडजोडीअंती अडीच लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार एसीबीने सापळा लावला. बुधवारी पहिला हप्ता म्हणून ८० हजार रुपये घेऊन तक्रारदाराने पोलीस ठाणे गाठले. पैसे स्वीकारताना एसीबीने चौधरीला अटक केली. त्याच्याकडे या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. त्याच्या मालमत्तेबाबतही एसीबी चौकशी करत आहेत.