लाचखोर पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 12:52 AM2018-12-05T00:52:56+5:302018-12-05T00:53:01+5:30
इस्टेट एजंटकडून १० हजार रुपयांची लाच घेताना वाकोला पोलीस ठाण्याचा साहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पीठे (३८) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी बेड्या ठोकल्या. तसेच एसीबीने त्याच्या घरी झडती सुरू केली आहे.
मुंबई : इस्टेट एजंटकडून १० हजार रुपयांची लाच घेताना वाकोला पोलीस ठाण्याचा साहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पीठे (३८) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी बेड्या ठोकल्या. तसेच एसीबीने त्याच्या घरी झडती सुरू केली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार एजंटविरुद्ध वाकोला पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात मदत करण्यासाठी पीठेकडे तक्रारदाराने विनंती केली. मदत करण्याच्या नावाखाली पीठे याने २० हजार रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदाराने एसीबीकडे धाव
घेतली. पीठेसोबत झालेल्या
चर्चेत ठरल्याप्रमाणे सोमवारी १० हजारांचा हप्ता स्वीकारताना पीठेला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्या घरी झडती सुरू केली. त्याने आतापर्यंत अन्य काही लोकांकडून अशा प्रकारे पैसे घेतले आहेत का, या बाजूनेही पोलीस अधिक तपास करत आहेत.
>११ महिन्यांत १७७ पोलीस जाळ्यात
१ जानेवारी ते ३ डिसेंबरपर्यंत १७७ पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांच्याकडून २२ लाख २८ हजार ५०० रुपये सापळ्यादरम्यान जप्त केले आहेत. या कारवाईत मुंबई पोलिसांचा दुसरा क्रमांक लागत असल्याचे एसीबीच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.