Join us

पालिकेच्या लाचखोर अधिकाऱ्याने मागितली २७ लाखांची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:05 AM

एसीबीने घेतले ताब्यातलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : व्यावसायिकाकडून २७ लाखांची लाच मागणारा पालिकेचा लाचखोर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक ...

एसीबीने घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : व्यावसायिकाकडून २७ लाखांची लाच मागणारा पालिकेचा लाचखोर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. त्याच्यासह एका खासगी व्यक्तीला ५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. पालिकेच्या ए वॉर्ड विभागाचे दुय्यम अभियंता संदीप कारभारी गिते (४१) आणि खासगी व्यक्ती मुझफ्फर बाबू अली सय्यद ऊर्फ बबलू (४७) या दोघांना एसीबीने रंगेहाथ अटक केली.

तक्रारदार यांचा ससून डॉक येथे मासेविक्रीचा व्यवसाय आहे. येथील बीपीटीच्या पडीक जागेवर बोटी आणि खलाशांंसाठी गोडावून बांधण्याची परवानगी द्यावी याबाबत फोर्ट येथील पालिकेच्या ए वॉर्डमध्ये अर्ज केला होता, तसेच गोडावून बांधण्याचे काम तेथील बबलू नावाच्या व्यक्तीकडे दिले होते. बबलूने गितेसोबत संगनमत करीत ८ मार्च रोजी तक्रारदारांची भेट करून दिली. तेव्हा गितेने २७ लाखांची लाच मागितली.

तक्रारदारांनी याबाबत एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने सापळा रचून ५ लाख रुपये घेताना गितेला रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी एसीबीचे पथक अधिक तपास करीत आहे.

.......................

....

आणखी एक अधिकारी जाळ्यात

घर दुरुस्तीसाठी एका खोलीमागे १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पालिकेचा कनिष्ठ अभियंता अविनाश इंगूळकर (३१) आणि कामगार मदन हरिभाऊ नौबत (३२), अमोल लोखंडे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.