महिला लिपिक, निबंधकासह अन्य एकाचा सहभाग : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी दोन हजारांची लाच मागितल्याप्रकरणी विवाह नोंदणी कार्यालयातील लिपिक आणि निबंधक आणि खासगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्याकडे विवाह नोंदणी कार्यालयातील लिपिक योगश्री गायकवाड आणि विवाह निबंधक श्वेता चौधरी यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी तत्काळ एसीबीकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून एसीबीने पडताळणी केली. सापळा रचला. त्या वेळी या प्रकरणात सहभागी खासगी इसम दत्तात्रय जाधव याने तडजाेडीअंती २ हजार रुपये देण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना जाधवला रंगेहाथ पकडण्यात आले.
गायकवाड यांनी तक्रारदारांचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार केले आणि चौधरी यांनी संबंधित प्रमाणपत्रावर सही करून जाधवच्या गुन्हेगारी कृत्यास सहकार्य केले म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.