* सीबीआयची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जप्त केलेली ६० किलो चांदी परत देण्यासाठी २ लाखांची लाच घेताना सीमा शुल्कच्या मुंबई विभागातील अधीक्षक व सहायक आयुक्तांना बुधवारी अटक करण्यात आली. केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एससीबी) ही कारवाई केली. नीरज सिंग व सहायक आयुक्त ए. पी. बांडेकर अशी त्यांची नावे असून दोघांना २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. चांदी परत देण्यासाठी सहायक आयुक्त बांडेकरने १५ लाख तर अधीक्षक नीरज सिंगने ४ लाखांची मागणी केली होती. त्यापैकी २ लाख घेताना नीरजला रंगेहात पकडले तर बांडेकरला कार्यालयातून अटक करण्यात आली.
कोल्हापुरातील एक खासगी कंपनी चालविणाऱ्या व्यापाऱ्याने गेल्या वर्षी ५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथून आणल्या होत्या. दुसऱ्या दिवशी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी ती जप्त केली. त्यापैकी दोन पार्सलमधील ६० किलो चांदी ही शुल्क चुकवून आणल्याचे तपासून स्पष्ट झाले. ही चांदी परत मिळवून देण्यासाठी सहायक आयुक्त (पी) बांडेकर आणि अधीक्षक, नीरज सिंग (आर अँड आय) यांनी व्यापाऱ्याकडे पैशांची मागणी केली. व्यापाऱ्याने त्याबाबत सीबीआयकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी बुधवारी सापळा रचून अटक केली. त्यांच्या कार्यालय व घराची झडती घेण्यात आली असून अधिक तपास करण्यात आली आहे.