महापालिकेच्या लाचखोर कर्मचाऱ्याला अटक
By admin | Published: September 17, 2015 03:14 AM2015-09-17T03:14:21+5:302015-09-17T03:14:21+5:30
एका मशिदीच्या बांधकामाबद्दल कारवाईची नोटीस न देण्यासाठी १० हजारांची लाच घेणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
मुंबई : एका मशिदीच्या बांधकामाबद्दल कारवाईची नोटीस न देण्यासाठी १० हजारांची लाच घेणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शेषराव राठोड असे त्याचे नाव असून, पालिकेच्या एम/ पूर्व विभागात कनिष्ठ आवेक्षक म्हणून तो काम करीत होता. त्याच्याबाबत आणखी गैरव्यवहाराच्या काही तक्रारी असल्यास तक्रारदारांनी समोर येण्याचे आवाहन एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
सुन्नी इस्लामिया मस्जीद या संस्थेतर्फे सेक्टर डी/ई येथे मशिदीचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी रीतसर आवश्यक परवानगी घेण्यात आलेली आहे. मात्र बांधकामामुळे परिसरात कचरा, डेब्रिज व डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मशिदीच्या बांधकामाची देखरेख करणाऱ्या व्यक्तीने या ठिकाणी कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी पालिकेच्या एम/पूर्व विभागात अर्ज केला होता. त्यावर विधी विभागातील कनिष्ठ आवेक्षक असलेल्या शेषराव राठोडने नोटीस काढल्याचे सांगून ती रद्द करण्यासाठी ९० हजारांची मागणी केली.
अखेर तडजोडीनंतर त्याने ५० हजारांवर काम करण्याचे मान्य केले. फिर्यादीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून राठोडविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार ठरलेल्या रकमेतील १० हजारांचा हप्ता नवी मुंबईतील खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ तक्रारदाराकडून घेत असताना राठोडला पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून यापूर्वी कोणाची लुबाडणूक झालेली असल्यास नागरिकांनी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन एसीबी अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)