Join us

व्यावसायिकाची फाइल ‘मार्गी’ लावण्यासाठी लाचखोरी; कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 8:03 AM

उपलब्ध माहितीनुसार, मुंबईस्थित आलोक इंडस्ट्रीज या कंपनीच्या व्यवहारांची फाइल दिल्लीत कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या पडताळणीसाठी आली होती.

मुंबई : स्वतःच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या व्यावसायिकांच्या फाइल्स मार्गी लावण्यासाठी लाचखोरी करणाऱ्या कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाचे दोन सहसंचालक, एक सहायक महिला आणि मुंबईतील एक खासगी कंपनीचा अधिकारी अशा चौघांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी अटक केली.  उपलब्ध माहितीनुसार, मुंबईस्थित आलोक इंडस्ट्रीज या कंपनीच्या व्यवहारांची फाइल दिल्लीत कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या पडताळणीसाठी आली होती. ही फाइल मार्गी लावण्यासाठी कंपनीचा अधिकारी रिषभ रायजादा याने कॉर्पोरेट मंत्रालयात सह-संचालक असलेल्या पुनीत दुग्गल याच्याशी संपर्क केला. या अधिकाऱ्याने देखील ही फाइल सकारात्मकरीत्या बंद करण्याचे आश्वासन दिले. याकरिता चार लाख रुपयांची लाच ठरविण्यात आली होती.पुनीत दुग्गल याने त्याच्या पातळीवर फाइल मार्गी लावल्यानंतर ती महासंचालक कार्यालयाकडे पाठविली व तिथे कार्यरत असलेला अन्य सहसंचालक मनजित सिंग याच्याकडे पाठविली. त्यानेदेखील ही फाइल दुग्गल याच्या सांगण्यानुसार सकारात्मक प्रतिक्रियेसह बंद केली. या फाइलच्या हालचालींवर  या कार्यालयात सहायक असलेल्या रुही अरोराने लक्ष ठेवत त्याची माहिती वेळोवेळी रिषभ रायजादा याला दिली. हे काम झाल्यानंतर रिषभ याने पुनीत याच्या घरी जाऊन चार लाख रुपये पोहोचविले. या प्रकरणाची माहिती ‘सीबीआय’ला मिळाल्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली. 

टॅग्स :भ्रष्टाचारमुंबईगुन्हेगारीलाच प्रकरण