अनलॉकनंतर लाचखोरी पुन्हा वाढली; महसूलपाठोपाठ पोलीस विभागातही भ्रष्टाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 07:41 AM2022-06-15T07:41:18+5:302022-06-15T07:42:21+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनमुळे लाचखोरीला ब्रेक लागला. मात्र अनलॉकचा टप्पा सुरू होताच लाचखोरी पुन्हा वाढल्याचे एसीबीच्या कारवाईतून स्पष्ट होत आहे.
मुंबई :
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनमुळे लाचखोरीला ब्रेक लागला. मात्र अनलॉकचा टप्पा सुरू होताच लाचखोरी पुन्हा वाढल्याचे एसीबीच्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. काही हजारांत पगार असणारे १०० ते २०० रुपयांची लाच घेतल्याची ही काही प्रकरणे उघड झाली आहेत.
गेल्या वर्षी लाचखोरी प्रकरणी राज्यात ७७३ गुह्यांची नोंद झाली. त्यात ७६४ सापळा कारवाईचा समावेश आहे. २०२० च्या तुलनेत हा आकडा ११० ने जास्त आहे. वर्षभरात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या २११ पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याचे उघड झाले आहे.
वर्षभरात १०९९ आरोपींवर कारवाई
यामध्ये मुंबई (५०), ठाणे (८९), पुणे (१६८),नाशिक (१२९),नागपूर (७२),अमरावती (७३), औरंगाबाद (१३०),नांदेड (६२) गुह्याचा समावेश आहे. यामध्ये एकूण १०९९ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या वर्षभरात पोलिसांविरोधात १७३ कारवाई करण्यात आली आहे. तर २०२० मध्ये हाच कारवाईचा आकडा १५४ होता.
लाचखोरीनंतरही १२ पोलीस सेवेत
- लाचखोरीच्या कारवाईनंतरही पोलीस दलातील १२ पोलिसांवर अद्याप निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही.
- गेल्या वर्षभरात लाचखोरीच्या गुह्यांत महसूल विभाग आघाडीवर असून त्यापाठोपाठ पोलीस विभाग दुसऱ्या क्रमांकावर होते.
- लाच मागणे जसा गुन्हा आहे तसेच देणे देखील गुन्हा असल्याचे एसीबीचे म्हणणे आहे. कोणी लाच मागत असल्यास तात्काळ एसीबीकडे धाव घ्या किवा एसीबीच्या १०६४ हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीकडून केले आहे.