मुंबई : घराच्या वाढीव बांधकामाबातची तक्रार मागे घेण्यासाठी आणि एमआरटीपी अंतर्गत पुढील कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच घेताना पालिकेच्या भांडुप एस विभागाचे इमारत व कारखाने विभागाचे लाचखोर कनिष्ठ अभियंता योगेश पंडीत आणि माहिती अधिकार कार्यकर्ता रणजीत रामसुरत यादव यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुसक्या आवळल्या.भांडुप तुलशेतपाडा परिसरात तक्रारदार राहण्यास आहे. तक्रारदार यांचे त्याच परिसरात एक मजली घर आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी घराच्या दुरुस्तीचे काम केले होते. हे काम अनधिकृत असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता यादव याने पालिकेच्या एस विभागाकडे केली होती. या तक्रारीवरुन कारवाई करत पालिका अधिकाऱ्यांनी तक्रारदार यांच्यावर एमआरटीपी कारवाई अंतर्गत नोटीस बजावली होती. नोटीसवरुन कारवाई न करणे आणि केलेली तक्रार मागे घेण्यासाठी पालिकेचा लाचखोर अभियंता पंडीत याने २५ हजारांची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार तक्रारदाराने पैसे देण्यास होकार दिला. आणि ठरल्याप्रमाणे शनिवारी दुपारी भांडुप मधुबन गार्डन येथे यातील पहिला हप्ता म्हणून दहा हजारांची रक्कम घेण्यासाठी पंडीत आणि यादव आले होते. त्याचदरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना दहा हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
लाचखोर पालिका अभियंता गजाआड
By admin | Published: July 26, 2015 3:40 AM