नांदेड/मुंबई - कोरोना काळात अनेकांनी साधारण पद्धतीने लग्नसोहळा उरकला आहे. तर, काहींनी लग्नाचा अनावश्यक खर्च टाळत मुख्यमंत्री सहायता निधी आणि पंतप्रधान केअर फंडासाठीही पैसे दिले आहेत. नांदेडमधील गायकवाड कुटुंबीयांनीही आपल्या छोटेखानी लग्नसोहळ्यात कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. नांदेडमधील बुद्धिस्ट असोशिएशनला गायकवाड कुटुंबियांकडून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यात कुणाकडूनही त्यांनी भेटवस्तू स्विकारल्या नाहीत.
नांदेड येथील पत्रकार जयपाल गायकवाड यांनी आपल्या विवाह सोहळ्यात कोरोना काळात उपयोगी येणारे 1 लाख किमतीचे दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नांदेड बुद्धिस्ट असोशिएशनला मोफत दिले. सध्याच्या कठीण काळात प्रत्येकांनी एकमेकांची मदत करणे आवश्यक आहे. या हेतूने महाराष्ट्र राज्याचे उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी नुकतेच कोरोना आणि दान पारमिताला अनुसरुन सर्वांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मदत करण्याचे आवाहन केले होते, डॉ. कांबळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण हा उपक्रम राबविल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
जयपाल गायकवाड यांचा रविवारी (ता. ११) संबोधी चिखलीकर यांच्याशी विवाह झाला. या सोहळ्यात आपण कोरोनाच्या काळात अनेकांना गमावले, ही एका व्यक्तीच्या कुटुंबाची हानी तर आहेच पण समाजाचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय साधने व सुविधा उपलब्ध करुन देणे ही खूप आवश्यक बाब बनली आहे. कोरोना काळात सामूहिकपणे गरजूंना मदत केली पाहिजे या हेतूने डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी हा उपक्रम राबवल्याचे जयपाल यांनी सांगितले. जयपाल यांच्या निर्णयाचं त्यांच्या नववधू संबोधी यांनीही स्वागत करत, सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल कौतुकही केलं. मी स्वत: पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असल्याने कोरोना काळ, परिस्थिती आणि सामाजिक बांधिलकी जवळून अनुभवतोय, त्यातूनच हे कर्तव्य पार पाडल्याचं गायकवाड यांनी म्हटलं.
डॉ. कांबळेंच्या समाजकार्यातून प्रेरणा
डॉ. कांबळे यांनी कोरोना महामारीच्या काळात राज्यात २५ हजार गरजुंना अन्नधान्याचे किट्स वाटप केले. तसेच मूळ थायलंडच्या असणाऱ्या डॉ. कांबळे यांच्या पत्नी रोजाना व्हॅनीच कांबळे यांच्याकडून भारताला २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. त्यासोबतच नुकत्याच ३१ ऍम्ब्युलन्सही भारताला मिळाल्या आहेत. इतके मोठे दान आपल्यापर्यंत पोहचवण्याचं काम डॉ. कांबळे यांच्या माध्यमातून होत असताना आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ही मदत केली असल्याचे जयपाल गायकवाड यांनी सांगितले. तसेच, कोरोनाने खूप काही शिकवलंय. धडपड, मदत, सामाजिक जाणीव आणि आपलं समाजाप्रतिचं उत्तरदायित्वही कोरोनाने दाखवून दिलंय. या काळात अनेक सामाजिक संस्था अन् संघटनांनी स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करुन दाखवलंय.