"बिहारमध्ये पूल कोसळला, 'त्याच' कंत्राटदाराला गोरेगाव-मुलुंड रस्त्याचे काम"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 02:05 PM2023-06-06T14:05:16+5:302023-06-06T14:05:35+5:30
आयुक्तांनी या कंपनीला दिलेल्या कामाबद्दल फेरविचार करावा अशी मागणी काँग्रेस नेते रवी राजा यांनी पत्रातून केली आहे.
मुंबई – गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या बांधकामाचे काम ज्या पी. एस सिंगला कंपनीला दिले आहे. ते काम त्यांच्याकडून काढून घेण्यात यावे अशी मागणी काँग्रेस नेते रवी राजा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना केली आहे. त्याचे कारण म्हणजे बिहारमध्ये भागलपूर येथे गंगा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पूलाचं बांधकाम याच कंपनीकडून सुरू होते. त्यामुळे गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या उड्डाणपूलाचं बांधकाम दुसऱ्या कंपनीला द्यावे अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा म्हणाले की, डिसेंबर २०२१ ला हा प्रस्ताव पास करून पी.एस सिंगला कंपनीला जानेवारीत वर्क ऑर्डर दिली आहे. हा मुंबईसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा पूर्व आणि पश्चिम कंपनीला जोडणारा आहे. पी.एस सिंगला कंपनी जी मुंबईत पहिल्यांदा काम करतेय. त्यांना येथील रस्त्याचे बांधकाम करण्याचे कंत्राट मिळाले आहे. त्यांनी कामाला सुरूवात केली आहे. पी. एस सिंगला कंपनीकडून २० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र या कंपनीने बिहारमध्ये बांधलेला पूल कसा कोसळला हे सर्वांनी पाहिले आहे. हे बघून मी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.
आयुक्तांनी या कंपनीला दिलेल्या कामाबद्दल फेरविचार करावा अशी मागणी काँग्रेस नेते रवी राजा यांनी पत्रातून केली आहे. बिहारमध्ये पूल कोसळला, मुंबईत पूल कोसळला तर त्याला जबाबदार कोण राहील? या कंपनीच्या कामाची पद्धत तपासायला हवी. बिहारच्या घटनेची मुंबईत पुनरावृत्ती नको. बिहारमध्ये जर या कंपनीला ब्लॅक लिस्ट केले तर मुंबई महापालिकेनेही या कंपनीला ब्लॅक लिस्ट करावे. पी. एस सिंगलाकडून काम काढून घ्यावे. मुंबई महापालिकेने खबरदारी घ्यावी. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी हा प्रस्ताव बनवला होता. या कामाबाबत ताबडतोड कंपनीचे कंत्राट रद्द करा, फेरविचार करावा असं रवी राजा यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.