शिक्षक व मुख्याध्यापकांपुढे शंकांचा ‘सेतू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:07 AM2021-07-07T04:07:21+5:302021-07-07T04:07:21+5:30
प्रश्नांचे संकलन करून आयुक्तांना पाठवण्याची वेळ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सद्य:स्थितीत राज्यातील शाळांत शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के असताना ...
प्रश्नांचे संकलन करून आयुक्तांना पाठवण्याची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सद्य:स्थितीत राज्यातील शाळांत शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के असताना ४५ दिवसांत सेतू अभ्यासक्रम विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेणे शक्य आहे का? प्रत्येक शाळेत जवळपास २५ टक्के मुलांकडे स्मार्ट फोन नाहीत मग सेतू अभ्यासक्रमाची पुस्तके शिक्षण विभाग देणार नसेल तर शाळेने झेरॉक्स करून मुलांना देणे अपेक्षित आहे का, असे अनेक प्रश्न राज्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांपुढे आहेत. त्यामुळे शाळा व मुख्याध्यापकांकडून येणाऱ्या या प्रश्नांच्या उत्तरांसाठी यांचे संकलन करून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या (डायट) आयुक्तांना पाठविण्याची वेळ आली आहे.
मागील वर्षभर कोरोनामुळे शाळा बंद आहेत. दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने उजळणीच्या माध्यमातून ते भरून काढण्यासाठी एससीईआरटीकडून सेतू अभ्यासक्रम (ब्रीज कोर्स) बनविण्यात आला असून, शाळांना तो पाठविण्यात आला आहे. मात्र तो विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहचवायचा, त्यासाठी आर्थिक तरतुदीचे काय, पुढील नियोजित अभ्यासक्रमाचे कसे करायचे, असे अनेक प्रश्न शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी अनुत्तरित आहेत. हे प्रश्न घेऊन ते जिल्ह्यातील डायट अधिकाऱ्यांकडे वारंवार जात असल्याने अखेर डायट अधिकाऱ्यांनीच या प्रश्नांचे संकलन करून आयुक्तांना मार्गदर्शनाची विनंती केली आहे.
सेतूवर प्रश्नचिन्ह
सेतू अभ्यासक्रमात मागील इयत्तेची उजळणी आहे. दरम्यान, त्या इयत्तांची पुस्तके विद्यार्थ्यांनी शाळेत जमा केल्याने आता उजळणीसाठी त्यांच्याकडे पुस्तके उपलब्ध नसल्याने सेतूच्या उजळणीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सद्य:स्थितीत केवळ मराठी व हिंदी माध्यमाचा सेतू अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तसेच सेतू अभ्यासक्रम केवळ पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असल्याने ऑफलाइन विद्यार्थ्यांसाठी काय उपाययोजना आहे याबद्दल स्पष्टता नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने सेतू संबंधित सुरुवातीला शाळेतील शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना स्पष्टता आणावी आणि मगच त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शिक्षकांचे सेतू बाबतीतील काही प्रश्न
- सेमी इंग्रजी आणि उर्दू माध्यमातील सेतू कधी उपलब्ध होणार?
- सेतू अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत पुढील अभ्यासक्रम घ्यायचा नाही तर आतापर्यंत शिकविले त्यात खंड पडणार नाही का?
- ग्रामीण भागातील मुलांकडे दिवसभर मोबाइल नसल्याने त्यांच्या ऑनलाइन शिक्षणात अडचणी येतात, मग सेतूची उजळणी कशी करून घ्यावी?
- ४५ दिवसांच्या सेतू अभ्यासक्रमात अनेक सुट्ट्या आहेत , त्यामध्ये अभ्यासक्रम उजळणी होणार नाही मग ४५ दिवस पूर्ण होणार कसे?
- पीडीएफच्या झेरॉक्सच्या नावाखाली पालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे त्यावर काय उपाय?