एससीईआरटीला इंग्रजीच्या पुस्तकात चाचण्या समाविष्ट करण्याचा विसर
सीमा महांगडे
मुंबई : शिक्षण विभागाचा गोंधळ आणि असमन्वयाचा प्रकार सेतू अभ्यासक्रमाच्या चाचण्यांच्या निमित्ताने पुन्हा समोर आला आहे. सेतू अभ्यासक्रम सद्यस्थितीत मराठी आणि हिंदी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. मराठी माध्यमाच्या सहावी ते दहावीच्या इंग्रजी सेतू अभ्यासक्रमाच्या पुस्तिकेत या चाचण्यांचा समावेशच नसल्याचे पुढे आले आहे. दुसरी ते पाचवीच्या पुस्तकात चाचण्या आहेत, त्यामुळे शिक्षण विभागाच्या घाईगडबडीचा प्रत्यय यानिमित्ताने समोर आल्याच्या प्रतिक्रिया शिक्षक देत आहेत. अनेक शाळांतील इंग्रजी विषय शिक्षकांनी याबद्दल तक्रारी केल्या असून, चाचण्यांचा समावेशच नाही, तर उजळणी अभ्यासक्रमाचे अध्ययन निष्पत्ती कशी घ्यायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
ऑनलाईन शिक्षणामुळे शैक्षणिक नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची उजळणी व्हावी, या हेतूने शिक्षण विभागाकडून सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली. हा अभ्यासक्रम राबविताना अध्ययन निष्पत्तीच्यादृष्टीने ठराविक कालावधीनंतर विषयनिहाय प्रत्येकी ३ चाचण्यांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. या चाचण्या विद्यार्थ्यांनी सोडविणे आवश्यक असून शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने सोडवून घेऊन त्या तपासाव्यात आणि या चाचण्यांच्या गुणांची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवणे आवश्यक असल्याची माहिती एससीईआरटीकडून देण्यात आलेली आहे. मात्र आता ज्यांची परीक्षा घेऊन नोंद ठेवायची आहे, त्या चाचण्याच उपलब्ध नसतील, तर नोंद ठेवायची कशी, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित होत आहे. येत्या आठवड्यात पहिली चाचणी होणे अपेक्षित असताना आता त्याही शिक्षकांनी स्वतःच तयार करून घ्यायच्या का? असा प्रश्न उपनगरातील एका इंग्रजी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात एससीईआरटीचे (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) संचालक दिनकर टेमकर यांना विचारले असता, सेतू अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांचा मागील वर्षाच्या अभ्यासाचा पाय मजबूत करण्याच्या हेतूने उजळणी म्हणून घेतला जात आहे. शिक्षकांनी स्वतः उजळणी अभ्यासाच्या चाचण्या तयार करून विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली तरी चालणार आहे. या सगळ्यांतून विदयार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती नोंद करून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे हा उद्देश असल्याचे टेमकर यांनी सांगितले.
सेतू अभ्यासक्रमातील लहान लहान चुकांची नोंद करून त्याच्या अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे. लवकरच शिक्षकांना यासंदर्भात नवीन सूचना केल्या जातील, तोपर्यंत शिक्षकांनी उजळणी सुरू ठेवावी.
- दिनकर टेमकर , संचालक, एससीईआरटी