ग्रँट रोडमध्ये पुलाला तडे; दुरुस्तीनंतर वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:40 AM2018-07-05T00:40:43+5:302018-07-05T00:40:50+5:30
अंधेरी येथे रेल्वेमार्गावरील गोखले पूल कोसळण्याची घटना ताजी असताना मंगळवारी मध्यरात्री ग्रँट रोड येथील उड्डाणपुलाला तडे गेल्याचे समोर आले. हा पूल तत्काळ वाहतुकीसाठी बंद करून रेल्वे प्रशासनालाही सतर्क करण्यात आले.
मुंबई : अंधेरी येथे रेल्वेमार्गावरील गोखले पूल कोसळण्याची घटना ताजी असताना मंगळवारी मध्यरात्री ग्रँट रोड येथील उड्डाणपुलाला तडे गेल्याचे समोर आले. हा पूल तत्काळ वाहतुकीसाठी बंद करून रेल्वे प्रशासनालाही सतर्क करण्यात आले. तसेच या पुलावरील वाहतूक केनेडी पूल व अन्य मार्गाने वळविण्यात आली. मात्र केवळ पुलाच्या पृष्ठभागावर भेगा असल्याने कोणताही धोका नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे हा पूल तात्पुरत्या दुरुस्तीनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
नाना चौकवरून ग्रँट रोड रेल्वे स्थानकाजवळील फेरस पूल अशी वाहतूक सुरू असते. ग्रँट रोड पश्चिम आणि नाना चौकाला जोडणाऱ्या या पुलावर मंगळवारी रात्री ११.१०च्या सुमारास तडे गेल्याचे लक्षात आले. या पुलाची पाहणी करून महापालिका व वाहतूक पोलिसांनी हा पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाना चौकातून या पुलावरून होणारी वाहतूक केनेडी पुलाकडे वळविण्यात आली.
मात्र हा पूलही ब्रिटिशकालीन असल्याने वाहतुकीची गती मंदावली. पुलाच्या मध्यभागी असलेल्या या भेगांची महापालिकेच्या अभियंत्यांनी पाहणी केली. डी विभागाचे सहायक आयुक्त, अग्निशमन दलाचे अधिकारी, वाहतूक पोलीस अशी टीमच घटनास्थळी दाखल झाली. मात्र या भेगा पुलाच्या पृष्ठभागावर म्हणजेच सर्फेसवर असून पुलाच्या खालील बाजूस नसल्याने धोका नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. तसेच या पुलाची तत्काळ दुरुस्ती करून दुपारनंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पूल विभागातील अधिकाºयांच्या पाहणीनंतर दुरुस्तीबाबत निर्णय होणार आहे.
- पृष्ठभागावर भेगा, धोका नाही : सुरक्षेच्या दृष्टीने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलाच्या पृष्ठभागावर भेगा असून पुलाच्या खालच्या बाजूस नाहीत. त्यामुळे पुलाला धोका नाही. मात्र पूल विभागाचे अधिकारी सखोल पाहणी करून पुढील कार्यवाही करतील, असे पालिकेच्या डी विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोठे यांनी सांगितले.
- ही तर तात्पुरती मलमपट्टी : ग्रँट रोड पुलावर पडलेले खड्डे व तडे गेलेल्या ठिकाणी डांबर व खडी टाकण्यात आली. मात्र ही तात्पुरती मलमपट्टी असून महापालिका नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.