Join us

पुलांच्या तपासणीत टॉवर वॅगनचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 3:39 AM

अंधेरी दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय हद्दीतील पुलांच्या तपासणीस शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे.

मुंबई : अंधेरी दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय हद्दीतील पुलांच्या तपासणीस शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. या पूल तपासणीदरम्यान टॉवर वॅगनचा वापर करण्यात आल्याने वेळेची बचत होत असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय हद्दीतील पुलांच्या (रोड ओव्हर ब्रिज) सुरक्षा तपासणीला शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील रेल्वेच्या हद्दीतील सर्व ४४५ पुलांची सुरक्षा तपासणी करण्याचे निर्देश रेल्वेच्या अधिकाऱ्यांना नुकतेच दिले होते. वांद्रे व महालक्ष्मी येथील पुलांना भेट देऊन या तपासणीला प्रारंभ करण्यात आला. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता, प्रधान मुख्य अभियंता आर. के. मीना, मुख्य सुरक्षा अधिकारी मनोज शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकाºयांनी महालक्ष्मी येथे या तपासणीमध्ये सहभाग घेतला व आवश्यक त्या सूचना दिल्या, पण पुलांची तपासणी करताना टॉवर वॅगनचा वापर केल्याने वेळेची बचत होत आहे. पूर्वी पुलाची तपासणी करण्यास ४ तास लागत असत. मात्र, नवीन टॉवर वॅगनचा वापर केल्याने हा वेळ निम्म्याने कमी होऊन २ तास झाला आहे, असे रवींद्र भाकर यांनी सांगितले.