लोअर परळ स्थानकाजवळील रेल्वे पुलाचे तोडकाम ६० टक्के पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 06:41 AM2018-12-27T06:41:54+5:302018-12-27T06:42:13+5:30
लोअर परळ स्थानकाजवळील रेल्वे पुलाच्या तोडकाम काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. १०० वर्षे जुना असलेला लोअर परळचा पूल दुरुस्तीसाठी जुलै महिन्याच्या अखेरपासून वाहन, तसेच पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला आहे.
- कुलदीप घायवट
मुंबई : लोअर परळ स्थानकाजवळील रेल्वे पुलाच्या तोडकाम काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. १०० वर्षे जुना असलेला लोअर परळचा पूल दुरुस्तीसाठी जुलै महिन्याच्या अखेरपासून वाहन, तसेच पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला आहे. तोडकाम २० आॅगस्टपासून सुरू झाले आहे. मागील चार महिन्यांत या पुलाचे तोडकाम ६० टक्के पूर्ण झाले आहे. नवीन पूल उभारण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
लोअर परळ पुलाचे तोडकाम जलद गतीने सुरू आहे. रेल्वे मार्गावरील गर्डर हटविण्याचे काम आता करण्यात येणार आहे. पुलाचे काम रात्रीच्या वेळी करून गर्डर हटविण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली.
जुलैपासून सर्व वाहनांनासाठी हा पूल बंद करण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा फटका बसला आहे. करी रोड आणि लोअर परळ या स्थानकापासून वरळी नाक्याच्या दिशेने जाणाºया शेअर टॅक्सी चालकांच्या दिवसातील फेºया कमी झाल्या आहेत.
लोअर परळ येथून वरळी नाक्यासाठी सुमारे ७० टॅक्सी जातात. लोअर परळच्या पुलाचे काम सुरू झाल्यानंतर एक महिना व्यवसाय विस्कळीत झाला होता. मात्र, लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांनी पुलाजवळ टॅक्सी थांबा दिल्याने दिलासा मिळाला आहे. पूर्वी एका टॅक्सीच्या दिवसाला १५ ते १७ फेºया होत होत्या. आता १० फेºया होत आहेत. काम होईपर्यंत या गैरसोयीला सामोरे जावे लागेल, असे वरळी टॅक्सी चालक मालक संघटनेचे सुबोध मोरे म्हणाले. सुरुवातीला पुलावरून जाण्यास पादचाºयांना बंदी होती. नंतर पुलाच्या एका बाजूकडील रस्ता पादचाºयांसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर, लोअर परळ पूर्वेकडील प्रवेशद्वार खुला करण्यात आला आहे.
प्रवाशांना त्रास होणार नाही
लोअर परळ स्थानकाजवळील रेल्वे पुलाचे तोडकाम ६० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुरू आहे. आताच्या परिस्थितीत पुलाचे गर्डर हटविण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर काही काळासाठी हलविण्यात येतील. हे काम रात्रीच्या वेळी करण्यात येईल. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना या कामाचा त्रास होणार नाही. पुलाचे संपूर्ण काम होण्यासाठी दोन वर्षे लागतील.
- मुकुल जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे.