मुंबई : पवई येथील जय भीम नगर परिसरात भल्यामोठ्या नाल्यावरील पूल बांधण्यासाठी वर्क आॅर्डर काढून तब्बल पाच वर्षे झाली तरी अद्याप पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. उलट जुना पूल तोडून महापालिका मोकळी झाल्याने कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे.
सन २00१ च्या सुमारास स्थानिक रहिवाशांनी आपली गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने या पुलाच्या पायाची उभारणी केली होती. त्यावर महापालिकेच्या हायड्रोलिक इंजिनीअरिंग विभागाने बांधकाम करून हा पूल उभारला होता. कालांतराने हा पूल तसेच मोरारजी नगर येथील पूल कोसळण्याच्या स्थितीत आले. त्यामुळे या दोन्ही पुलांची नव्याने उभारणी करण्यासाठी मुख्य अभियंता (पूल) यांनी या दोन्ही पुलांच्या कामांची वर्क आॅर्डर काढली. १ कोटी ३८ लाख ४६ हजार रुपयांना या कामाचा ठेका काढण्यात आला. मात्र पुलाचे पूर्ण काम न करता महापालिका २0१५ ते २0१८ या कालावधीत केवळ पुलाची डागडुजी करत राहिली, असे रहिवाशांनी सांगितले.
१४ मे रोजी महापालिकेने हा पूल पूर्णपणे पाडून टाकला. मात्र अद्याप नव्या बांधकामाचा पत्ता नाही, अशी रहिवाशांची तक्रार आहे. दरम्यान, हा पूल पाडण्यात आल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. दररोज तीन हजार रहिवासी या पुलाचा उपयोग करतात. त्यांना तब्बल दीड किलोमीटरचा वळसा घालून पलीकडे जावे लागते. त्यामुळे रहिवासी किरकोळ भराव टाकून कसाबसा नाला ओलांडत आहेत. आता पावसाळा येत असल्याने हालात आणखी भर पडणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे युद्धपातळीवर या पुलाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत असून तो तत्काळ उभारण्यात न आल्यास आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.
या पुलाचे पाडकाम करणाऱ्या महापालिकेने पुलाच्या बांधकामाकडे मात्र गेली पाच वर्षे दुर्लक्ष केले आहे. हा पूल तत्काळ उभारून महापालिकेने रहिवाशांना दिलासा द्यावा, यासाठी आम्ही महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहोत. - पवन पाल, सामाजिक कार्यकर्ते