Join us

पुलांच्या कामांना अखेर मिळणार वेग; दोन वर्षांपासून रखडले होते काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 2:40 AM

पूल विभागासाठी तब्बल २२८१ कोटी रुपयांची तरतूद

मुंबई : दोन वर्षांपासून धोकादायक पुलांचे काम रखडल्याने  मुंबईकरांची गैरसोय होत आहे; मात्र आगामी आर्थिक वर्षात पुलांची कामे वेगाने करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. यासाठी पूल विभागासाठी तब्बल २२८१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर रेल्वे मार्गावरील काही पादचारी पूल व भुयारी मार्गांचे कामही प्राधान्याने केले जाणार आहे.पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणी, मिठी नदी - पोईसर, दहिसर, वालभट नदी संबंधातील कामे, नवीन पर्जन्य जलवाहिन्या पंपिंग स्टेशन, बोगद्यांची कामे आणि मुंबईमध्ये पुराच्या वेळी सामना करण्याकरिता मोठ्या कामांसाठी ७८८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी काही प्रकल्पांवरील कामे सुरू करण्यात आली आहेत. तर २१ पुलांची पुनर्बांधणी, ४७ पुलांची मोठी दुरुस्ती आणि १४४ पुलांची किरकोळ दुरुस्ती केली जाईल. यापैकी ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, कर्णाक पूल आणि मिठी नदीच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. तसेच पश्चिम उपनगरातील खाडी परिसरातील पाच पुलांची कामे आगामी आर्थिक वर्षात सुरू केली जाणार आहेत. रेल्वे मार्गावरील ११ पादचारी पूल आणि भुयारी मार्गांसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.प्रकल्पासाठी दोन हजार कोटींची तरतूदलोअर परळ आणि भायखळा अशा काही ठिकाणी पादचारी पूल बांधण्यासाठी महापालिकेमार्फत रेल्वेला २६२ कोटी रुपये दिले जाणार आहेत.गोरेगाव - मुलुंड जोडरस्त्यासाठी १३०० कोटी रुपयांची तरतूद आगामी आर्थिक वर्षात करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बोगदा जाणार आहे. सन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षात ११११ कोटी रुपये पूल विभागासाठी राखून ठेवण्यात आले होते. आगामी आर्थिक वर्षात ही तरतूद दुप्पट करण्यात आली आहे.