मुंबई : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग एएमआरडीएने मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केल्यापासून पालिकेची जबाबदारी वाढली आहे. या मार्गाची, शिवाय मार्गात असणाऱ्या पुलांचीही देखभाल करावी लागत आहे. या पादचारी पुलांचे, अन्य पुलांचे स्कायवॉकचे आणि कल्व्हर्टचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे.
ऑडिट पूर्ण झाल्यानंतर नेमक्या कोणत्या ठिकाणी डागडुजीची गरज आहे हे निश्चित होईल, त्यानंतर पुढील कामे हाती घेतली जातील. किरकोळ दुरुस्तीची कामे आणि मोठ्या दुरुस्तीची कामे असे स्वरूप असेल. पादचारी पूल, उड्डाणपूल यांची सद्यस्थिती काय आहे, कोणत्या ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे, कोणती कामे प्राधान्याने हाती घ्यावी लागतील, यादृष्टीने ऑडिट केले जाणार आहे. त्यासाठी व्ही.जे.टी. आय. मधील तञ् व्यक्तींची समिती नियुक्त करण्यात आली आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावर १५ तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर ४० पूल, पादचारी पूल आहेत. ऑडिट पूर्ण झाल्यानंतर डागडुजीचा आवाका लक्षत येईल, त्यामुळे अंदाजित खर्चही कळेल. या दोन्ही मार्गावर उड्डाणपूल आहेतच; शिवाय महामार्ग ओलांडण्यासाठी विविध विभागात पादचारी पूलही उभारण्यात आले आहेत. अनेक पादचारी पुलांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी पुलाच्या पायऱ्यांच्या याद्या उखडला आहेत, रेलिंग तुटले आहे, काही ठिकाणी लाईट नसते. महामार्ग ओलांडण्यासाठी हे पादचारी पूल महत्वाचे आहेत. त्यामुळे त्यांची वेळीच डागडुजी होणे आवश्यक आहे.
जाहिरातबाजीचे उत्पन्न एएमआरडीएच्या तिजोरीत
- यापूर्वी दोन्ही महामार्ग एएमआरडीएने होते. अर्थात त्यावेळी देखभाल आणि डागडुजीची कामे एएमआरडीएने करत असे. अलिकडे महामार्ग पालिकेला हस्तांतरित करण्यात आले आहेत. हे महामार्ग पालिकेला हस्तांतरित झाले असले तरी मार्गावर होणाऱ्या जाहिरातबाजीचे उत्पन्न मात्र एएमआरडीएच्या तिजोरीत जात आहे.- जाहिरातीचे उत्पन्न आम्हाला मिळावे अशी मागणी पालिकेने एएमआरडीएकडे अनेकदा केली आहे. मात्र एएमआरडीएने दखल घेतलेली नाही. महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाने पालिकेला हस्तांतरित केलेल्या काही प्रकल्पाबाबतही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे पालिकेला स्वतःच्या तिजोरीतून खर्च करावा लागत आहे.