मुंबई : दाद कशी द्यावी हे पुलंनी शिकवले. आज पुलंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणीत आयोजित करण्यात आलेला महोत्सव त्यांच्या स्मृती जागवणारा असल्याचे मत कवी अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले. ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीचे औचित्य साधत प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’ सुरू झाला आहे. या प्रसंगी ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सल्लागार समितीचे सदस्य शैलेश चव्हाण, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालिका मीनल जोगळेकर आदी मंडळी उपस्थित होती.
राज्यगीताने महोत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विकास खारगे म्हणाले की, या पुलं कट्ट्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार एकत्र यावेत यासाठी पुलं महोत्सव आयोजित केला आहे. अरुण म्हात्रे यांनी सादर केलेल्या काही कवींच्या कवितेतील ओळींना उपस्थितांनी दाद दिली.
कार्यक्रमांची पर्वणीसर्वांसाठी विनामूल्य असलेल्या या महोत्सवात साहित्य, गायन, वादन, नृत्य, नाट्य अशा विविध कलाप्रकारांवर आधारित अनेक कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. उद्घाटनानंतर कलांगणातच कोल्हापूरच्या काफिला संस्थेचा मराठी, हिंदी, उर्दू, प्रेम साहित्यावर आधारित ‘जियारत’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. स्नेहल शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. ९ नोव्हेंबरला नवीन लघुनाट्यगृहात पं. डॉ. राम देशपांडे यांच्या ‘शतदीप उजळले’ हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, संध्याकाळी ६:३० वाजता ओमकार अंध-अपंग सामाजिक संस्थेचे विशेष प्रशिक्षण घेतलेले दिव्यदृष्टी असलेल्या कलाकारांचा मल्लखांब कार्यक्रम होईल.