मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेतर्फे इंडिया स्किल्स -२०२१ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जिल्हा स्तर, विभागीय स्तर आणि राज्य स्तर अशा तीन विभागांत होणार आहे. याची पहिली फेरी नुकतीच पार पडली असून, यात ३ हजार ६०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. पुढील राज्य स्तरावरील स्पर्धा ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान पार पडतील. कुर्ला येथील डॉन बॅस्को शाळेत ऑफलाइन पद्धतीने ही स्पर्धा होणार आहे.
ग्रंथालय दिन साजरा
मुंबई - मालवणी चिक्कूवाडी येथील पटीसेन एज्युकेशन ट्रस्ट संचालित नागसेन विद्याविहार पूर्व प्राथमिक शाळेच्या वतीने भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. राधाकृष्णन रंगनाथन यांची १२९ वी जंयती ग्रंथालय दिन म्हणून नुकतीच साजरी करण्यात आली. यावेळी, दिवंगत सत्यनारायण गोयंका यांची साधना ग्रहण करण्यात आली.
आदिवासींसह रक्षाबंधन
मुंबई : लावणी कलावंत महासंघ आणि आम्ही मराठा वाद्य पथकाच्या वतीने खिंडीपाडा येथील पळसपाडा आदिवासी पाड्यावर रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. याप्रसंगी आदिवासी महिलांनी फेराची गाणी व मुलांनी तारफा नृत्य सादर केले. यावेळी मुलांना खाऊ, खेळणी आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.